Pimpri News: महापालिका बर्ड फल्यू सदृश आजाराचे सर्वेक्षण करणार

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत शहरातील पोल्ट्री व्यावसायिक तसेच घरगुती कुक्कुटपालन व्यवसाय करणा-या व्यक्तींची माहिती संकलित करण्यात येत आहे. अशा ठिकाणी बर्ड फल्यू सदृश आजाराचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचे मृत्यू झाल्याचे आढळल्यास वैद्यकीय विभागामार्फत इतर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी पशुवैद्यकीय अधिका-यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे.

राज्यातील परभणी, बीड, मुंबई, ठाणे या जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्ल्यू विषाणूचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. त्यामुळे अनेक पक्षी कोंबड्या, बदके, कावळे मृत्यू पावल्याचे दिसून आले आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव शहरामध्ये अद्यापि आढळून आलेला नाही. तथापि, शहरातील काही भागांमधून 1 ते 2 संख्येमध्ये कावळे, कबुतर व वटवाघुळ मृत झाल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहे. त्यामुळे खबरदारी घेण्यात येत असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी सांगितले.

फ्लू सारखी लक्षणे आढळून आल्यास त्वरित रुग्णालयामध्ये संपर्क साधा

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सध्या राज्यातील मुंबई,ठाणे, परभणी, बीड आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पक्षामध्ये बर्ड फ्लू आजाराचा विषाणू आढळून आलेला आहे. बीड वगळता इतर जिल्ह्यांमध्ये एच 5 एन1  हा विषाणू आढळून असून बीड मध्ये एच 5 एन 8 हा विषाणू आढळून आला आहे.

या आजारामध्ये फ्लूसारख्या आजाराचे लक्षणे आढळून येतात. प्रामुख्याने अति जोखमीच्या व्यक्ती म्हणजेच ज्या व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबे पोल्ट्री फार्म मध्ये रहात आहेत. तसेच जे कोंबड्यांची नियमीत देखभाल करत आहेत. अशा व्यक्तींना फ्लू सारखी लक्षणे आढळून आल्यास त्यांनी त्वरीत नजीकच्या  महापालिकेच्या रुग्णालय/दवाखान्यामध्ये संपर्क साधवा, असे आवाहन अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.

एखाद्या परिसरात मोठ्या प्रमाणात कावळे, पाणबगळे अथवा कोंबड्यामध्ये अनपेक्षित मृत्यू झाल्याचे घटना दिसून आल्यास त्वरीत महापालिकेच्या पशुवैद्यकिय विभागास व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सारथी हेल्पलाईन 8888006666 या क्रमांकावर कळविण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.