Pimpri : महापालिका चिखलीत जलशुद्धीकरण केंद्र बांधणार, 79 कोटींचा खर्च 

स्थायी समिती समोर प्रस्ताव 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील वाढीव क्षेत्रातील गावांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी आंद्रा आणि भामा आसखेड धरण पाणीपुरवठा योजनेंतर्गत देहू बंधा-यातून शंभर एमएलडी पाणी उचलण्यात येणार आहे. त्यासाठी चिखली येथे 100 दक्ष लक्ष लीटरचे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे. केंद्राच्या बांधकाम आणि देखभाल दुरुस्तीसाठी 79 कोटी 2 लाख रुपये खर्च येणार असून हे काम गोंडवाना इंजिनिअर्स या ठेकेदाराकडून करुन घेण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी (दि. 28) होणा-या स्थायी समिती समोर मान्यतेसाठी ठेवला आहे. 

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 22 लाखाच्या पुढे गेली आहे.  शहर झपाट्याने वाढत आहे.  शहरात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्पाची संख्या वाढल्याने पवना धरणातून उचलण्यात येणारे 480 एमएलडी पाणी कमी पडत आहे. त्यामुळे शहरातील कोणत्याही भागात पूर्णदाबाने पाणीपुरवठा होत नाही. शहरात पाणी टंचाई भासत आहे. शहरवासियांना पावसाळ्यातच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

आंद्रा व भामा आसखेड धरणातील मुख्य जलवाहिनी मंगरूळ व करंजविहिरे ते नवलाख उंब्रे येथील नियोजित बीपीटीपर्यंत व एकत्रित गुरूत्व जलवाहिनी नवलाख उंब्रे ते बीपीटी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका पर्यायी पाणीपुरवठा योजनेसाठी देहू येथील बंधा-यातून चिखलीत पाणी आणणार आहे. तेथून जवळच्या गावाला पाणी पुरवठा केला जाणार आहे. देहू बंधा-यातून 100 एमएलडी पाणी उचलण्यात येणार आहे.

चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यासाठी महापालिकेने देखभाल दुरुस्तीची रक्कम वगळून 46 कोटी 48 लाखांची (जीएसटी) सहित निविदा काढली होती. पाणीपुरवठा विभागाने या कामासाठी ठेकेदाराकडून जीएसटीची रक्कम वगळून निविदा दर मागविले.  त्यानुसार प्राप्त निविदांमध्ये गोंडवाना इंजिनिअर्स लि यांचा निविदा दर न्युनतम आहे. 300 दक्ष लक्ष लीटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे संकल्प चित्र तयार करणे आणि 100 दक्ष लक्ष लीटर क्षमतेचे जल शुद्धीकरण केंद्र बांधणे.

त्याअनुषंगिक कामे करण्यासाठी 46 कोटी 48 लाख रुपये खर्च येणार आहे. तर, 100 दक्ष लक्ष लीटर  क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे पुढील 10 वर्षाकरिता चालन, देखभाल व दुरस्ती करण्यासाठी 32 कोटी 54 लाख 60 हजार रुपये खर्च येणार आहे.  केंद्राचा बांधकाम खर्च 46 कोटी 48 लाख आणि देखभाल दुरुस्ती खर्च 32 कोटी 54 लाख 60 हजार (जीएसटी) वगळून असा 79 कोटी 2 लाख 60 हजार रुपयांची गोंडवाना इंजिनिअर्स या ठेकेदाराचा निविदा दर मंजूर झाला आहे. त्यांच्यासोबत करारनामा केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी होणा-या स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.