Pimpri : महापालिका आता निविदांच्या दराचे ‘सीओईपी’कडून करणार निश्चितीकरण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निविदांच्या वाढीव दराबाबत सातत्याने आरोप केले जातात. त्यासाठी आता महापालिका भांडार विभागाच्या वतीने काढण्यात येणा-या निविदांच्या दराचे पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून (सीओईपी) दर निश्चिती करून घेणार आहे. दर योग्य असेल तरच स्वीकारणार अन्यथा फेटाळण्यात येणार असल्याचे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी) पार पडली. विलास मडिगेरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भांडार विभागाच्या वतीने विकासकामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या जातात. निविदेच्या दराबाबत शंका-कुशंका असतात. या निविदांच्या वाढीव दरावरुन सातत्याने आरोप केले जातात. अनेक निविदा वाढीव दराचा असतात. कामाच्या तुलनेत निविदेचा दर जास्त असतो. त्यामुळे प्रशासनासह सत्ताधा-यांना टीकेचे धनी व्हावे लागते.

त्यामुळे आता निविदांचे दर योग्य आहे की अयोग्य याचे पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून (सीओईपी) दर निश्चितीकरुन घेतले जाणार आहे. भांडार विभागाशी संबंधित आवश्यकतेनुसार सर्व प्रकल्पांचे दराचे पृथ:करण केले जाणार आहे. हे काम सीओईपीला थेट पद्धतीने नियुक्त करण्यास आणि वेळोवेळी येणा-या प्रत्यक्ष खर्चास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

याबाबत बोलताना स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी म्हणाले, ”निविदांचे दर सीओईपीकडून तपासून घेतले जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात निविदांच्या दराबाबत अडचण येणार नाही. सीओईपीकडून दर निश्चितीकरुन घ्यायचे. योग्य असेल तर दर स्वीकारायचे अन्यथा फेटाळून लावले जाणार आहेत. त्यासाठी अंदाजे दोन लाख रुपये खर्च येईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.