BopKhel : संरक्षण विभागाच्या पर्यायी जागेपोटी महापालिका राज्य सरकारला 25 कोटी रूपये देणार

बोपखेल मुळा नदीवरील पूल

एमपीसी न्यूज – बोपखेल ते खडकीला जोडणारा मुळा नदीवरील पूल बांधण्यासाठी हस्तांतरीत जमिनीच्या किमती इतकीच जमीन संरक्षण विभागाला द्यावी लागणार आहे. जागेच्या बदल्यात पर्यायी जागा म्हणून संरक्षण विभागाच्या ताब्यातील राज्य सरकारची येरवडा येथील 7 हजार 367.3 चौरस मीटर जागा संरक्षण विभागाला देण्यात येणार आहे. त्यासाठी या जागेचे 25 कोटी 81 लाख रूपये मूल्य महापालिकेमार्फत राज्य सरकारला देण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी) पार पडली. विलास मडिगेरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

बोपखेल गावासाठी दापोडी येथून सीएमई हद्दीतून जाणारा रस्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 13 मे 2015 रोजी बंद करण्यात आला. बोपखेल गावासाठी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेमार्फत मुळा नदीवरील पूल ते खडकीतून जाणारा एलफिस्टन रस्ता ते टँक रस्ता पक्क्या स्वरूपात करण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षण करण्यात आले. 24 जून 2016  रोजी महापालिकेमार्फत संरक्षण मालमत्ता अधिकारी यांच्याकडे बोपखेल वासियांसाठी मुळा नदीवर पूल व पक्का रस्ता बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला.

संरक्षण मंत्रालयाने काही अटींवर 16 हजार 122 चौरस मीटर संरक्षण खात्याची जागा मुळा नदीवरील पुलासाठी महापालिकेकडे हस्तांतर करण्याची तयारी दाखविली. हस्तांतरीत जमिनीच्या किमती इतकीच जमीन संरक्षण विभागाला महापालिकेने दिली पाहिजे, या प्रमुख अटीसह बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवरील पूल बांधण्यास संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली. महापालिका स्थायी समिती आणि महापालिका सभेतही या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. तथापि, मंजूर ठरावामध्ये जागेच्या खर्चाबाबत मान्यतेच्या निर्णयाची स्पष्टता होत नसल्याने ठरावात दुरूस्ती करणे आवश्यक आहे.

बोपखेल येथील मुळा नदीवरील पुलासाठी संरक्षण विभागाच्या ताब्यातील 16 हजार 122 चौरस मीटर जागेच्या बदल्यात पर्यायी जागा म्हणून संरक्षण विभागाच्या ताब्यातील राज्य सरकारच्या येरवडा येथील 4 हेक्टर 22 गुंठे भूखंडापैकी 25 कोटी 81 लाख रूपये इतक्या सममुल्याची 7 हजार 367.3 चौरस मीटर इतकी जागा प्रदान करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेला नगररचना विभगाकडील ’भूसंपादन निधी’ या लेखाशिर्षामधून राज्य सरकारला या जागेचे मूल्य 25 कोटी 81  लाख रूपये दिले जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.