Mpc News Vigil : हलगर्जीपणा बेतोय जीवावर, 11 महिन्यात अपघातात अडीचशे हुन अधिक जणांनी गमावले प्राण

वर्षभरात 242 प्राणांतिक अपघात, फेब्रुवारीत मध्ये सर्वाधिक अपघात

एमपीसी न्यूज – खराब रस्ते, वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहतूक अशा अनेक कारणांमुळे अपघात होतात. यात चालकांचा हलगर्जीपणा हे महत्वाचे कारण अपघातांना निमंत्रण देत आहे. पेट्रोल, डीझेलचे काही युनिट वाचविण्याच्या नादात वाहन न्युट्रल, बंद करून चालवल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर 2020 या अकरा महिन्यांच्या कालावधीत 242 प्राणांतिक अपघात झाले आहेत. यात अडीचशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इतर किरकोळ अपघातांचा आकडा कित्येक पटींनी मोठा आहे.

पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक नगरी आहे. कारखान्यांमध्ये येणा-या वाहनांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणत आहे. त्याचबरोबर खाजगी आणि सार्वजनिक सेवेतील वाहने देखील मोठ्या प्रमाणत आहेत. नियोजितपणे वसलेले शहर म्हणून पिंपरी-चिंचवडकडे पाहिले जाते. शहरातले रस्ते, उड्डाणपूल प्रशस्त आहेत. मात्र, वाहतुकीला शिस्त नसल्याने अपघात होत आहेत. या अपघातांचे खापर केवळ बेशिस्त वाहन चालकांच्या माथी फोडून चालणार नाही. खड्डेमय रस्ते सुद्धा तेवढेच कारणीभूत आहेत.

जरासा उतार दिसला तरी वाहन चालक पेट्रोल, डीझेल वाचविण्यासाठी वाहन न्युट्रल करतात अथवा बंद करतात. न्युट्रल अथवा बंद केलेल्या वाहनाचे ब्रेक तातडीने लागत नाहीत. त्यामुळे समोरच्या वाहनांना धडक बसण्याची शक्यता कित्येक पटींनी वाढते. अवजड वाहनाने मागून धडक देऊन झालेल्या अपघातांचे प्रमाण शहरात सर्वाधिक आहे. अनेक दुचाकीस्वारांना चेंगरून ही वाहने बेदरकारपणे पुढे गेलेली आहेत.

मागील वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरात 289 प्राणांतिक अपघात झाले. तर यावर्षी त्याच अकरा महिन्यांच्या कालावधीत 242 प्राणांतिक अपघात झाले. ज्यामध्ये अडीचशे पेक्षा अधिक लोकांचा बळी गेला आहे. हात, पाय, बरगड्या मोडणे, फ्राक्चर होणे, खरचटणे अशा अपघातांची संख्या तर कित्येक पटींनी अधिक आहे.

अवजड वाहनाच्या धडकेत जास्त मृत्यू होत आहेत. अपवादात्मक घटनेत मोठ्या वाहनातील व्यक्तीचा मृत्यू झाले आहेत. वाहन बिघडल्यानंतर भर रस्त्यात उभे केल्याने त्या वाहनांना धडकून देखील काही अपघात झाले आहेत. एकंदरीत वाहन चालकांच्या चुकांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कठोर टाळेबंदीच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहने रत्यावर होती. गर्दी नसताना देखील अनेक अपघात झाले आहेत.

जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत झालेले प्राणांतिक अपघात –
जानेवारी – 28
फेब्रुवारी – 32
मार्च – 19
एप्रिल – 9
मे – 14
जून – 17
जुलै – 22
ऑगस्ट -19
सप्टेंबर – 25
ऑक्टोबर – 27
नोव्हेंबर – 29

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.