Vadgaon Maval : मुलांना नव्या जगाचे नवे नियम शिकवावे लागतील – शेखर गायकवाड

एमपीसी न्यूज – माणसे साधी राहिली असती तर न्याय सुद्धा साधा राहिला असता. दुर्दैवाने मात्र माणसे साधी राहिली नाहीत. 300 प्रकारचे कोर्ट आहेत. लोक जमिनीच्या वादात फक्त कोर्टाच्या आणि वकिलाच्या कार्यालयाच्या पाय-या झिजवत आहेत. सध्या तीन कोटी खटले भारतात प्रलंबित आहेत. प्रत्येकी दोन पक्षकार प्रमाणे तब्बल सहा कोटी लोक कोर्टाच्या चकरा मारत आहेत. एकमेकांना जिरविण्याची भाषा प्रत्येकजण करत आहे. त्यामुळे आपल्या मुलांना नव्या जगाचे नवे नियम शिकवावे लागतील. अडाणी माणूस शिकलेल्या लोकांना सहज गंडा घालतो. साधी दिसणारी माणसे कधी चलाखी दाखवतील काही सांगता येत नाही, हे दुर्दैव आहे, असे मत महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.

मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमालेत ते ‘ प्राॅपर्टी आणि माणूस’ या विषयावर बोलत होते. व्याख्यानमालेचे सहावे पुष्प शेखर गायकवाड यांनी गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील तर प्रमुख पाहूणे म्हणून माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे उपस्थित होते.

याप्रसंगी पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर,सचिव अनंता कुडे, भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, प्रदेश युवक सचिव जितेंद्र बोत्रे, मावळ मंचचे संस्थापक भास्कर आप्पा म्हाळसकर, कार्याध्यक्ष डॉ. रविंद्र आचार्य, यावर्षीचे अध्यक्ष शंकर भोंडवे, नगरसेवक प्रविण चव्हाण, किरण म्हाळसकर, अ‍ॅड विजय जाधव, माजी उपसरपंच सुधाकर ढोरेसह मंचाचे सर्व पदाधिकारी, जिल्हापरिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य,माजी सभापती, नगरसेवक, नगरसेविका पत्रकार बंधू तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरीक व महिला भगिनी उपस्थित होत्या.

साखर आयुक्त गायकवाड म्हणाले, ‘प्रत्येक गावात लग्न जमविण्यापासून जमिनीचा सौदा करण्यापर्यंत ही गुंतागुंत करणारी माणसे असतात. त्यांना कायम आपल्या जवळच ठेवावी लागतात, अन्यथा ती काय भानगडी करतील हे सांगता येणार नाहीत असे म्हणत अशी माणसे स्वातंत्र्याच्या वेळी निर्यात केली असती तर त्या देशांची वाट लागत लागत ते देश रसातळाला जाऊन मिळाले असते.’ ही फारच अद्भूत गोष्ट असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘दिलेला शब्द पाळत नाही, कायदा माहित नाही, एकमेकांची सामाजिक, राजकीय जिरवायची हौस आणि प्रशासकीय कारण हया चार कारणांनी जमीनी संदर्भात वाद,भांडणे होतात असेही गायकवाड यांनी सांगून
फार गुंतागुंत करून जीवन जगू नका’ असेही आवाहन त्यांनी केले.

गायकवाड पुढे म्हणाले की, ‘भारतीय माणसाएवढं ज्ञान जगात कोणत्याही देशात नाही. भारतीय माणसाचा आवडता कागद म्हणजे ॲफिडेव्हिट आहे. आपल्या लोकांना ज्ञानेश्वरी, महाभारत महत्वाचे वाटत नाही. पण कोणत्याही गोष्टीसाठी ॲफिडेव्हिट मात्र तात्काळ मिळते.’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल राऊत यांनी केले. सन्मानपत्राचे वाचन हर्षदा दुबे यांनी केले, तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय रविंद्र म्हाळसकर यांनी केला. अखेरीस आभार दीपक भालेराव यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.