India Corona Update : सक्रिय रुग्णांची संख्या पाच लाखांच्या पुढे, 24 तासांत 68,020 नवे रुग्ण 

एमपीसी न्यूज – देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात तब्बल 68 हजार 20 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासह देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून ती पाच लाखांच्या पुढे गेली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 20 लाख 39 हजार 644 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 13 लाख 55 हजार 993 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 32 हजार 231 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.32 टक्के एवढं झाले आहे.

देशात सध्या 5 लाख 21 हजार 808 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 291 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 61 हजार 843 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.34 टक्के एवढा आहे‌.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 24 कोटी 18 लाख 64 हजार 161 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 9 लाख 13 हजार 319 चाचण्या रविवारी (दि. 28) करण्यात आल्या आहेत.

 

 सहा कोटी नागरिकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस 

देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये 60 वर्षांवरील तसेच 45 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 6 कोटी 5 लाख 30 हजार 435 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. एक एप्रिल पासून 45 वर्षांवरील सर्वांना लस टोचण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.