सोमवार, डिसेंबर 5, 2022

Pune Corona Update : पुण्यात सक्रिय बधितांचा आकडा 45 हजारांच्या पुढे

एमपीसी न्यूज : गेल्या 24 तासांतील बाधितांच्या आकडेवारीने दुसऱ्या लाटेचेही रेकॉर्ड ब्रेक केल आहे; शुक्रवारी त्याही पुढे जाऊन बाधितांच्या आकडेवारीचा अक्षरश: स्फोट झाला आहे. शुक्रवारी 8 हजार 301 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली. यामुळे शहराचा पॉझिटिव्हिटी दर 40.81 टक्के झाला आहे.

ही तिसरी लाट आहे असे केंद्र किंवा राज्य सरकार अद्याप म्हणत नसले तरी, गेल्या महिन्याभरापासून बाधितांची संख्या वाढत आहे. सुरूवातीला ती जरी धिम्या गतीने वाढत असली तरी गेल्या आठवडाभरात बाधितांचा वेग प्रचंड आहे. 25 टक्के पॉझिटिव्हिटी दरावरून थेट 35 टक्‍क्‍यांवर तो गेला आणि शुक्रवारी तर तो 40 टक्‍क्‍यांवर आला. दुसऱ्या लाटेमध्ये सात हजारांच्या बाधितांनंतर करोनाचा प्रादुर्भाव उतरणीला लागला होता. मात्र सद्यपरिस्थितीत तो वाढतच असल्याचे दिसून येत आहे.

याशिवाय सक्रीय बाधितांची संख्या येत्या आठ-दहा दिवसांत पाऊण लाखांचा टप्पा गाठेल, असे भाकीत करण्यात येत आहे. सद्यस्थितीत सक्रीय बाधितांची संख्या 45 हजार 081 झाली आहे. तर त्यातील व्हेंटिलेटरवर असलेल्या गंभीर रुग्णांची संख्या 47 आहे. आणि इव्हेसिव्ह व्हेंटिलेटरवर असलेल्यांची संख्या 27 आहे. याशिवाय ऑक्‍सिजनवर असलेल्या बाधितांची संख्या 297 आहे.

गेल्या 24 तासांत 10 बाधितांचा मृत्यू झाला असून, त्यातील 4 बाधित पुणे शहरातील असून, 6 बाधित पुण्याबाहेरील आहेत. गेल्या तीन दिवसांपासून बाधित मृतांची संख्याही वाढत आहे. यांचा समावेश करून शहरातील मृतांची संख्या 9 हजार 172 झाली आहे. तसेच दिवसभरात 5 हजार 480 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Latest news
Related news