New Delhi: देशातील कोरोनाबाधित मृतांची संख्या अवघ्या दहा दिवसांत 500 वरून 1000 वर!

एमपीसी न्यूज – भारतात कोरोनाबाधित मृतांच्या आकड्याने अवघ्या 10 दिवसांमध्ये 500 वरून एक हजारचा टप्पा ओलांडला आहे. दहा दिवसांत मृतांचा आकडा दुपटीने वाढला आहे. देशात आतापर्यंत 1,008 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. हा आकडा मोठा वाटत असला कोरोनाबाधितांच्या जागतिक मृत्यूदरापेक्षा भारतातील मृत्यूदर निम्म्याहून कमी राखण्यात भारताला यश आले आहे, ही त्यातल्या त्यात समाधान बाब म्हणावी लागेल.

भारतात कोरोनाचा पहिला बळी 12 मार्चला कर्नाटकमध्ये कलबुर्गी येथे गेला. त्या ठिकाणी एका 65 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतांचा पहिला शंभरचा आकडा गाठण्यास 25 दिवसांचा कालावधी लागला. पाच मार्चला भारतातील कोरोना बळींच्या संख्येने शंभरचा आकडा ओलांडला. त्यानंतर हा आकडा 200 पर्यंत पोहचण्यास केवळ चार दिवस लागले. त्यानंतर दर तीन दिवसाला हा आकडा 100 ने वाढत असल्याचे दिसून येत आहे. हा मृत्यूचा वेग स्थिर ठेवण्यात भारताला यश आल्याने कोरोनाला 500 बळींचा टप्पा ओलांडण्यास एकूण 37 दिवस लागले आहेत. त्यानंतर मात्र अवघ्या दहा दिवसांत मृतांचा आकडा 1000 च्या पुढे गेला आहे. तीन दिवसाला शंभर हे प्रमाण वाढून दोन दिवसाला शंभर व आता एका दिवसाला शंभरने वाढल्याचे दिसून येत आहे, ही चिंता वाढविणारी बाब आहे.

12 मार्च – पहिला कोरोना बळी

31 मार्च – 35 कोरोना बळी

पाच एप्रिल – 100 कोरोना बळी (25 दिवस)

नऊ एप्रिल – 200 कोरोना बळी (4 दिवस)

12 एप्रिल – 300 कोरोना बळी (3 दिवस)

15 एप्रिल – 400 कोरोना बळी (3 दिवस) 

18 एप्रिल – 500 कोरोना बळी (3 दिवस) (एकूण 38 दिवस)

21 एप्रिल – 600 कोरोना बळी (3 दिवस)

23 एप्रिल – 700 कोरोना बळी (2 दिवस)

25 एप्रिल – 800 कोरोना बळी (2 दिवस)

27 एप्रिल – 900 कोरोना बळी (2 दिवस)

28 एप्रिल – 1000 कोरोना बळी (1 दिवस) (एकूण 48 दिवस)

पहिल्या 100 बळींसाठी कोरोनाला 25 दिवस लागले मात्र पुढच्या 400 बळींसाठी कोरोनाला फक्त 13 दिवस लागले आहेत. त्यानंतर अवघ्या 10 दिवसांत बळींची संख्या एक हजारच्या पुढे गेली आहे.

जगाचा कोरोनाचा मृत्यूदर 6.94 टक्के तर भारताचा 3.22 टक्के 

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 31 हजार 324 इतकी असून कोरोनाबाधित मृतांची संख्या 1,008 आहे. म्हणजे कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा मृतांचे प्रमाण हे 3.22 टक्के इतके आहे. हेच जागतिक प्रमाण 6.94 टक्के आहे. त्यामुळे भारताची परिस्थिती ही जगातील अन्य कोरोनाबाधित देशांच्या तुलनेत खूप बरी असल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.