Omicron Update : महाराष्ट्रातील ओमायक्रॉनग्रस्तांची संख्या वाढली

एमपीसी न्यूज : ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील ओमायक्रॉनग्रस्तांची संख्या 8 होती. मात्र सोमवारी (दि. 6) मुंबईत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमायक्रॉनचे 2 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 10 झाली आहे. मुंबईत आढळलेल्या दोन्ही रुग्णांवर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील काही बाबींवरील निर्बंध कठोर केले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पुढील आठ दिवसांत त्यावर निर्णय होईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

ओमायक्रॉनचा धोका, त्याचे गुणधर्म समजून घेऊन आगामी आठ-दहा दिवसांत निर्बंधांबाबत ठोस निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. तूर्तास मास्क, सोशल डिस्टन्स, लसीकरण व हाताची स्वच्छता या चतु:सूत्रीवर भर राहील, असेही त्यांनी सांगितले.

आता देशातील ओमायक्रॉनग्रस्तांची संख्या 23 वर पोहोचली आहे. यामध्ये कर्नाटक (2), गुजरात (1), महाराष्ट्र (10), राजस्थान (9), दिल्ली (1) यांचा समावेश आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.