Pimpri : तेलही गेले अन् तुपही गेले….., निष्ठावान शीतल शिंदे यांची अवस्था!

हाती धुपाटने आले

एमपीसी न्यूज – स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपचे निष्ठावान असलेले शीतल शिंदे यांनी मिळणारे उपमहापौरपद नाकारले. परंतु, दुस-यावेळी देखील स्थायी समिती अध्यक्षपदाने हुलकावणी दिल्याने तेलही गेले अन् तूपही गेले आणि हाती धुपाटने आले, अशी अवस्था शिंदे यांची झाली आहे.  

शिंदे भाजपचे निष्ठावान आहेत. प्रभाग क्रमांक 19 उद्योगनगर, आनंदनगर, भाटनगर दळवीनगर परिसरातून शिंदे सलग      दुस-यावेळी निवडून आले आहेत. फेब्रुवारी 2017 मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्यावर्षी शिंदे यांची विधी समितीत निवड झाली होती. परंतु, त्यांना स्थायी समिती हवी असल्याने त्यांनी विधी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. दुस-यावर्षी शिंदे यांची स्थायी समितीत निवड झाली. परंतु, अध्यक्षपद मिळाले नसल्याने त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

तिस-या वर्षी शिंदे यांची पुन्हा स्थायी समितीत निवड झाली. परंतु, यावेळी देखील अध्यक्षपदाने त्यांना हुलकावणी दिली. दुसरे निष्ठावान विलास मडिगेरी यांना अध्यक्षपद मिळाले. शिंदे यांनी केलेली बंडखोरी मागे घेतली.  महापौर, उपमहापौरांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर शीतल शिंदे यांना पक्षाने उपमहापौरपद देऊ केले होते. परंतु, त्यांनी ते नाकारले. त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळेल अशी अपेक्षा होती. यावेळी त्यांना पक्ष, स्थानिक नेतृत्वाने अध्यक्षपदाचा शब्द दिला होता, असा त्यांचा दावा होता. परंतु, यावेळी देखील त्यांना अध्यक्षपदाने हुलकावणी दिली आहे.

आमदार महेश लांडगे यांचे समर्थक संतोष लोंढे यांचा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.  यावेळी डावलून देखील शिंदे यांनी बंडखोरी केली नाही. शिंदे यांना मोठा ‘गॉडफादर’ नाही. त्यात आमदारांनी पदांचे अलिखितपणे वाटप करुन घेतले आहे. त्यामुळेच शिंदे यांना स्थायी समिती अध्यक्षपदाने हुलकाविणी दिल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरु आहे. प्रदेशनेतृत्व, आमदारांनी शिंदे यांना शब्द दिला होता. त्यासाठी अर्ज भरायला देखील बोलविली होते. परंतु, अचानक भोसरीतील लोंढे यांचा अर्ज दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.