Chinchwad News : मी उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो, माझ्या व्यतिरिक्त कुणाचा फोन आला तर मला सांगा; मी बघतो : अजित पवार

एमपीसी न्यूज – मी उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो, गुन्हेगारांना अजिबात पाठीशी घालू नका. शहरातील गुन्हेगारी संपवताना गुन्हेगार कोणत्या पक्ष, गटाचा आहे, हे पाहू नका. त्याला वाचविण्यासाठी कुणाचा फोन आला तर मला सांगा. त्या फोनवाल्याकडं मी बघतो, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांना दिले.

पिंपरी-चिंचवड पोलिसांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्मार्ट वॉच, स्पोर्ट्स सायकल वाटपात करण्यात आले. चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “मी उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो, गुन्हेगार कुठल्या पक्ष, गटाचा आहे, त्याचा अजिबात विचार करू नका. मी तुमच्या सोबत आहे. कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होऊ देत नाही. गुन्हेगाराला अजिबात पाठीशी घालू नका. माझ्या व्यतिरिक्त कुणाचा फोन आला तर मला सांगा मी बघतो त्या फोनवाल्याकडं. माझी मतं स्पष्ट असतात.

पिंपरी-चिंचवड शहरात पूर्वी रात्रीच्या वेळी वाहने जाळणे, गुंडांची दहशत असे प्रकार घडत होते. गुन्हेगारीसोबत गुन्हेगारीचे साईडइफेक्ट वाढले. हे साईडइफेक्ट बंद होऊन गुन्हेगारीच बंद व्हायला हवी. जे करायचंय ते करा, पण गुन्हेगारी मोडून काढा. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीत घाई झाली. आयुक्तालय सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी संपविण्यासाठी मी स्वतः लक्ष घातलं आहे. पोलिसांना गस्तीसाठी, पोलिसिंगसाठी वाहने कमी असल्याची माहिती मिळाली, त्याबाबत चर्चा झाल्यानंतर तिस-या दिवशी निधी दिला आहे. पोलिसांनो तुम्ही काम करा, गुन्हेगारी संपवा, असेही पवार म्हणाले.

पवार पुढे म्हणाले, “संसाधने नसतील तर पोलिसांकडून कामाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत महाराष्ट्रात बेस्ट आहे. त्याच प्रमाणे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची इमारत देखील महाराष्ट्रात बेस्ट करणार. फक्त त्या इमारतीमधून काम सुद्धा बेस्ट झालं पाहिजे. गुन्हेगारीमुक्त शहर करण्याची माझी इच्छा पूर्ण करा, पोलीसांच्या बळकटीकरणासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.