BNR-HDR-TOP-Mobile

Dapodi : ‘हॅरिस’चा समांतर पूल उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत

एमपीसी न्यूज – बोपोडी सिग्नल चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हॅरिस पुलाला समांतर पूल बांधण्यात आला आहे. त्याचे काम देखील पूर्ण झाले असतानाही पूल वाहतुकीस खुला केला नाही. पूल उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. पुलाचे उद्‌घाटन केले जात नसल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. दरम्यान, आचारसंहिता संपल्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस या पुलाचे उद्‌घाटन होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिक नगरीसोबतच मोठ्या उड्डाणपुलांचे आणि सुसज्ज वाहतूक व्यवस्था असलेले शहर म्हणूनही ओळख आहे. मात्र, पुणे शहराकडून पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करतानाच नागरिकांना मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. हॅरिस पुलावरील वाहतूक कोंडी नित्याचीच बाब बनली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील प्रशस्त रस्त्यावरून वेगात येणारी वाहनांना अरूंद असलेल्या बोपोडी सिग्नल चौकात ब्रेक लागतो. त्यामुळे हॅरीस पुलाला समातंर पूल बांधण्याचे काम महापालिकने हाती घेतले होते.

या कोंडीतून मुक्‍तता करण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने संयुक्‍तरित्या हॅरिस पुलाच्या दोन्ही बाजूला समांतर पूल बांधण्याचा प्रकल्प मे 2016  मध्ये हाती घेतला होता.  या प्रकल्पाचा खर्च 22 कोटी 46 लाख रुपये आहे. पुलाची लांबी 202 मीटर असून रुंदी 10.5 मीटर आहे. तसेच, पुण्याकडील पोच रस्त्याची 145 मीटर असून पिंपरीच्या दिशेची 65 मीटर आहे. याचबरोबर, पुण्याकडून पिंपरीच्या दिशेने येण्यासाठी वाहनांना चार लेन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पिंपरीकडून पुण्याच्या दिशेने जाणारा नवीन पूल दोन जुलै 2018  रोजी वाहतुकीला खुला करण्यात आला. बोपोडीतील झोपडपट्टीच्या स्थलांतराला विलंब झाल्यामुळे पुण्याहून पिंपरीकडे येण्याच्या पुलाच्या बांधकामाला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर पुलाचे काम पूर्ण झाले असून पूल उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

याबाबत बोलताना उपअभियंता तथा प्रवक्ता विजय भोजने म्हणाले, ”समांतर पुलावरील पथदिवे, संरक्षण कठडे, डांबरीकरण, रंगरंगोटी व इतर कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात आली आहेत. त्यानंतर या पुलावर वाहनांची चाचणी घेतली जाणार असून, त्यानंतर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. बोपोडीतून या पुलाच्या रस्त्याला जोडणा-या रस्त्यांचे काम बाकी असल्याने या पुलाचे काम काही दिवस संथ गतीने सुरू होते.  आता अपूर्ण कामे पूर्ण करून हा पूल सार्वजनिक वाहतुकीस खुला करुन दिला जाईल”.

विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, ”दापोडीकडून पुण्याकडे जाणा-या हॅरिस ब्रीजला समांतर असलेल्या पुलाचे उद्‌घाटन सत्ताधारी भाजपने वेळेत न केल्याने राष्ट्रवादीने पुढाकार घेऊन त्या पुलाचे उद्‌घाटन केले होते. त्यानंतर डोळे उघडलेल्या भाजपने पुन्हा या पुलाचे उद्‌घाटन करुन, हा पूल सार्वजनिक वाहतुकीला खुला करुन दिला होता. आता या दुस-या बाजूच्या पुलाचे काम पूर्ण झाले असूनही, आचारसंहितेमुळे त्याचे उद्‌घाटन सत्ताधारी भाजपच्या सांगण्यावरून प्रशासन पुढे ढकलत आहे. याचा आम्ही निषेध करतो”.

HB_POST_END_FTR-A2