Pune: आंदोलन करून बेड मिळालेल्या रुग्णाचा अखेर मृत्यू 

The patient who got bed by agitation finally died.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आरोग्य सोयीसुविधा कितीही सक्षम असल्याचा दावा करण्यात येत असला तरी बुधवारी एका रुग्णाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.

शहरातील अनेक रुग्णालयात मंगळवारी रात्री रुग्णाला बेड मिळत नव्हता. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी अलका टॉकीज चौकात ठिय्या आंदोलन केले होते.

त्यानंतर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत तातडीने बेड उपलब्ध करून देण्यात आला. मात्र, बुधवारी सायंकाळी या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य सुविधांचे धिंडवडे उडाले आहेत.

पुणे शहरात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. सध्या शहरात 42 हजार 466 रुग्ण झाले आहेत. 16 हजार 269 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

एका एका बेडसाठी रुग्णांच्या खाजगी हॉस्पिटल समोर रांगा लागलेल्या आहेत. या हॉस्पिटलवाल्यांनी अक्षरशः लूट सुरू केली आहे.

मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत कोरोनाचे पडसाद उमटले होते. कोरोनाच्या अनेक रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नाही.

मंगळवारी रात्री धायरी येथील 33 वर्षाच्या तरुणाला न्यूमोनिया झाला होता. त्याच्या उपचारासाठी शहरातील अनेक रूग्णालयात जाऊन देखील बेड उपलब्ध झाला नव्हता.

यामुळे संतप्त झालेल्या या तरुणाच्या नातेवाईकांनी अलका टॉकीज चौकात रुग्णवाहिका उभी करून, ठिय्या आंदोलन सुरू केले होते.

या घटनेनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत तात्काळ विश्रांतवाडी येथील रूग्णालयात बेड उपलब्ध करून देण्यात आला होता.

त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला.

आंदोलन केल्यानंतर महापालिकेमार्फत बेड मिळाला.  वेळेत बेड मिळाला असता, तर या रुग्णाचा जीव वाचला असता. या घटनेला पुणे महापालिकेची यंत्रणा जबाबदार आहे. त्यांच्यावर कडक  कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.