chinchwad : रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्याकडून पवना नदीची महाआरती

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या सांडपाणी व प्रदूषण मुक्त जलपर्णी विरहित स्वच्छ सूंदर पवनामाई अभियानाच्या तिसऱ्या पर्वात शुक्रवारी (दि. 13) सायंकाळी 6.00 वाजता जिजाऊ पर्यटन केंद्र, मोरया गोसावी मंदिराशेजारी, चिंचवड येथे आपली संपूर्ण शहराची जीवनदायिनी पवनामाईची महाआरती संप्पन झाली.

या कार्यक्रमाला गेली दोन वर्षे अविरतपणे पिंपरी-चिंचवडमधील नदीच्या प्रदूषण आणि संवर्धनावर काम करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि १०० सहयोगी संस्थांचे प्रतिनिधी, इतर सामाजिक संस्था तसेच पाठीमागील दोन वर्षात रोटरीला नदी स्वच्छतेसाठी सीएसआर फंडातून भरघोस निधी देणारे एक्साइड बॅटरीज उद्योग समूहाचे सीईओ के अनिरुद्ध , एच आर मॅनेजर प्रफूल्ल जोशी आणि नीमा गिद्द, सद्गुरू इंटरप्रायजेसचे मेनकर साहेब हिंजवडी, देश का सच्चा हिरो चंद्रकांत दामोदर कुलकर्णी, आर्किटेकट ओजस कुलकर्णी व आकांक्षा कुलकर्णी व पिंपरी-चिंचवड शहरातील शेकडो नदी प्रेमी यावेळी उपस्थित होते. त्यांच्या आजवरच्या योगदानासाठी रोटरी क्लबच्या वतीने वरील सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या हस्ते पवनामाईची आरती करण्यात आली.

आपल्या पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जीवनदायिनी पवना नदीबद्दल नागरिकांमध्ये आत्मियता वाढावी, प्रेम वाढावे आणि त्याचबरोबर आपल्या कृतीतून नदीमध्ये कचरा अथवा कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक, सांडपाणी टाकू नये अथवा सोडू नये, अशा भावना प्रमुख पाहुण्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

इथून पुढे प्रत्येक महिन्याच्या दर पौर्णिमेला वेगवेगळ्या घाटावर रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी व इतर संस्थांच्या माध्यमातून महा आरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. असे यावेळी क्लबचे प्रेसिडेंट ऍड. रो. सोमनाथ हरपुडे यांनी नमूद केले. याचबरोबर जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थापक रो. प्रदीप पोपटराव वाल्हेकर यांनी केले व आभार रो. राजेंद्र चिंचवडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.