Pune : तुकोबांवरील नाट्याने चढवला नवरात्र महोत्सवाला कळस

एमपीसी न्यूज – घटस्थापनेनंतर नऊ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी झाल्यानंतर पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या जीवनावरील ‘जाऊ देवाचिया गावा’ या नाट्याच्या सादरीकरणाने महोत्सवाला कळस चढविला. तुकोबांचे जीवन उलगडणारे हे नाटक पाहण्यासाठी गणेश कला क्रीडा मंच खचाखच भरले होते. दहा दिवसांच्या या रौप्य महोत्सवी उत्सवाला रसिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल संयोजक आबा बागुल यांनी आभार मानले.

पुणे नवरात्र महोत्सव समिती, फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फौंडेशनतर्फे आयोजित २५ व्या पुणे नवरात्र महोत्सवाचा समारोप ‘जाऊ देवाचिया गावा’ या नाटकाने झाला. यावेळी मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया, महोत्सवाचे संयोजक आबा बागूल, जयश्री बागूल, घनःश्याम सावंत, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, अमित बागुल, विकी खन्ना यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

तुकोबांच्या आयुष्यातील प्रसंग हळुवारपणे मांडत प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या या नाटकाचे लेखन-दिग्दर्शन संजय भोसले यांनी, तर निर्मिती डॉ. जनार्दन चितोडे यांनी केली आहे. श्री श्री राधावृंदावनचंद्र चॅरिटेबल ट्रस्टने हे नाटक प्रस्तुत केले आहे. तुकारामांच्या मुख्य भूमिकेत संजय भोसले असून, त्यांनी तुकोबांना आपल्या भूमिकेतून जिवंत केले आहे. अशोक पत्की यांचे संगीत, सुरेश वाडकर, आनंद भाटे, देवकी पंडित, त्यागराज खाडिलकर, रवींद्र साठे यांचे गायन, तर मयूर वैद्य यांचे नृत्यदिग्दर्शन या नाटकाला आहे. महेश रांजणे यांनी नेपथ्य सांभाळले असून, योगेश शिरोळे यांनी सहदिग्दर्शन केले आहे.

तुकोबांचे लहानपण, तरुणपणातील जीवन, आवली-तुकोबांची भेट, शिवाजी महाराज व तुकाराम महाराज यांची भेट, रामेश्वर भट्ट यांच्याशी संवाद, गाथा बुडविण्याचा प्रसंग, वैकुंठगमन असे विविध प्रसंग अतिशय तरलपणे व सहजपणे मांडण्यात आले आहेत. याची मांडणी करताना वास्तवतेला कुठेही धक्का लागू न देता गीत आणि अभंगातून मनोरंजनाचा स्तरही उंचावला आहे. जवळपास अडीच तासाच्या या नाटकातून तुकोबा आपल्या काळजाला भिडतात.

याविषयी बोलताना संजय भोसले म्हणाले, “संतांचे जीवन समाजापर्यंत पोहोचावे, नाटकातून अध्यात्मिक प्रबोधन व्हावे, हा निर्मितीमागील उद्देश आहे. तुकोबांच्या आयुष्यातील अनेक दुःखाचे प्रसंग मांडताना अभंग, भजन याचा आधार घेतला आहे. त्यामुळे प्रबोधन आणि मनोरंजन हे दोन्ही उद्देश साध्य होत आहेत. सशक्त अभिनय, संगीत आणि भव्यदिव्यता यामुळे हे नाटक रसिकांच्या मनाचा ठाव घेत आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like