Pune News : पुण्यातील जनता वसाहतीत पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची पाईपलाईन फुटली

लाखो लीटर पाणी गेले वाया, 40 घरांमध्ये शिरलं पाणी, पाण्याच्या प्रेशरनं 9 जण जखमी, अचानक पाणी घुसल्यामुळे नागरिकांची तारांबळ

एमपीसी न्यूज : पर्वती पायथा येथूल आझाद मित्र मंडळ जनता वसाहतीमधून जाणारी जलशुद्धीकरण केंद्राची पाईपलाईन पहाटेच्या सुमारास फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले पण जनता वसाहतीतील 40 ते 50 घरांमध्ये पाणी घूसून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. गेल्या अनेक महिन्यांपासून पाईपलाईनमधून गळती होत असल्याचे निदर्शनास आले होते. दुरूस्तीसंदर्भात तक्रार करूनही महापालिका प्रशासनाकडून दिरंगाई केल्यामुळे हा अनर्थ ओढावल्याचा संतापजनक आरोप स्थानिक रहिवाश्यांनी केला आहे.

पाऊपलाईन फुटल्यानंतर पाण्याचा प्रेशर इतका जोरदार होता की त्यामुळे 9 ते 10 नागरीक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुन्हा भीषण पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली नाही. परंतु अचानक घरात पाणी घुसल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाकडून जलशुद्धीकरण केंद्राला जोडणाऱ्या पाईपलाईनचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला असून संबंधित पाईपलाईन दुरस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांकडून पाईपलाईनच्या कडेला अनधिकृत झोपड्या आणि बांधकामे केल्यामुळे पाईपलाईन गळती तसेच पाईप फुटण्याचे प्रकार होत असल्याचे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.