Pimpri: पीएमपीएलचे ‘ते’ कर्मचारी अखेर पालिका सेवेत

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या आस्थापनावर असलेल्या 178 कर्मचा-यांना अखेर पुन्हा पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत घेण्यात आले. याबाबतच्या आदेशावर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वाक्षरी केली आहे.

पुर्वीच्या पिंपरी-चिंचवड महापालिका परिवहनकडील (पीसीएमटी) अतिरिक्त ठरणारे कर्मचारी तात्पुरत्या स्वरुपात महापालिकेच्या विविध विभागांमध्ये पीसीएमटीकडून वर्ग करण्यात आले होते. या कर्मचा-यांची पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)ला नितांत गरज असल्याने पीएमपीएमएलकडे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी वर्ग करुन घेतले होते. त्याला पालिकेतील पदाधिका-यांनी जोरदार विरोध केला. तथापि, मुंढे यांनी कोणाच्या दबावाला न झुकता कर्मचा-यांना वर्ग करण्याचे सक्त ताकीद दिल्याने कर्मचारी पीएमपीएमएलमध्ये रुजू झाले होते.

या कर्मचा-यांवरुन मुंढे आणि पदाधिका-यांमध्ये चांगलीच जुंपली होती. पिंपरी पालिका त्या कर्मचा-यांचा पगार करत असल्याचे सांगत त्या कर्मचा-यांना महापालिका सेवेत रुजू करुन घेण्यासाठी पदाधिका-यांनी प्रयत्न केले होते. त्याबाबतचा ठराव देखील केला होता. त्यानंतर मुंढे यांची बदली झाल्यानंतर नयना गुंडे पीएमपीएलच्या अध्यक्षा म्हणून आल्या. त्यांनी कर्मचा-यांना महापालिकेकडे वर्ग करण्यास सकारात्मकता दर्शविली. त्यानुसार महापालिकेने त्या कर्मचा-यांना पालिका सेवेत वर्ग करुन घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.