Pune : चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्‍यता

एमपीसी न्यूज – चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्‍यता आहे. या उड्डाणपुलासाठी महापालिकेने 80 टक्के भूसंपादन पूर्ण केले असून ही जागा राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण (एनएचएआय)ला हस्तांतरित करण्यास सुरूवात झाली आहे.

महापालिकेकडून दि.22 ऑक्‍टोबरपासून संयुक्त मोजणी करून ही जागा “एनएचएआय’ला ताब्यात देण्यात येत असून 31 ऑक्‍टोबरपूर्वी 80 टक्के जागा देणार असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले. दरम्यान, उर्वरीत 20 टक्के जागा ही 20 नोव्हेंबरपूर्वी दिली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून या चौकात उड्डाणपूल प्रस्तावित केला होता. मात्र, या प्रकल्पाचा खर्च मोठा असल्याने महापालिकेकडून या प्रकल्पाचे काम “एनएचएआय’ला देण्यात आले. तर महापालिकेकडून भूसंपादन करून देण्यात येणार होते.
या पुलासाठी सुमारे 13.96 हेक्‍टर जागेची आवश्‍यकता होती. त्यातील सुमारे जवळपास 11 हेक्‍टर जागा पालिकेच्या ताब्यात आली आहे. या पुलाच्या कामासाठी आवश्‍यक 100 टक्के जागा ताब्यात आल्याशिवाय, पुलाचे काम सुरू करणार नाही, अशी भूमिका “एनएचएआय’ने घेतल्याने सप्टेंबर-2017 मध्ये भूमिपूजन होऊनही काम सुरू झालेले नसल्याने प्रशासन तसेच भाजपला टीकेचा सामना करावा लागत होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.