Pune : थंडीमुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता

एमपीसी न्यूज – शहरासह जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण आढळून आला नाही, त्यामुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले. मात्र, काही दिवसांनी शहरातील थंडीचा कडाका वाढणार असल्यामुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला, घसा दुखणे यासारखे आजार उद्‌भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी साथीच्या आजारांकडे दुर्लक्ष न करता, वेळीच तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉक्‍टरांकडून करण्यात आले आहे.

शहरात मागील चार ते पाच दिवसांपासून स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसून आले. चार दिवसांत साधारण 8 ते 10 हजार व्यक्‍तींच्या तपासणीतून एकही व्यक्‍ती स्वाईन फ्लूचा आढळून आला नाही, तर दोनशेच्या आसपास संशयित रुग्णांना टॅमीफ्लूची औषधे देऊन घरी सोडण्यात आले. शहरात स्वाईन फ्लूच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मागील दहा महिन्यात 557 जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. त्यामध्ये काही रुग्णांना प्राणही गमवावे लागले होते. मागील दोन दिवसांत 3 हजार व्यक्‍तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 80 संशयित रुग्णांना टॅमीफ्लूचे औषध देऊन घरी सोडण्यात आले. दरम्यान, अतिदक्षता विभागात 6 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर वॉर्डमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 25 वर होती, ती आता 4 वर आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.