Pimpri : बाप्पांच्या आगमनाची तयारी जोरात

मूर्तीकारांचे रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात 

एमपीसी  न्यूज –   गणरायांच्या आगमनाला अवघ्या तीन आठवड्याचा काळ राहिला असून अनेक गणपती कारखान्यांमध्ये गणरायाच्या मुर्ती आकारास येऊ लागल्या आहेत. बाप्पाच्या मूर्तीवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यासोबतच मूर्तीचे डोळे, दागिने आदी रंगरंगोटीची कामे सध्या वेगात सुरू असून त्यासाठी बारा ते अठरा तास रंगकाम करणारे कामगार झटत आहेत.

विघ्नहर्त्या गणेशाचा उत्सव अवघा काही दिवसांवर आला असून त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी कारखान्यांमध्ये जाऊन मूर्तींचे बुकिंग सुद्धा करून ठेवले आहे. चांगला पाऊस झाल्यामुळे यंदा गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असून मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे कामगार, रंग देण्यासाठी लागणारे कामगारांना चांगली मागणी आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी बुकिंग केलेल्या मूर्तींचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी त्याच्या रंगरंगोटीचे काम करण्यासाठी कामगार बारा ते अठरा तास कारखान्यांमध्ये थांबत आहेत. गणपतीच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवणे, मूर्ती वर मोहक रंग चढविणे, गणपतीच्या अंगावरील दागिन्यांवर बारीक कलाकुसर करणे, आदी कामे कामगार करीत आहेत.

याशिवाय  बहुतांश कारखाने मराठवाड्यासह मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, गुजरात, नागपूर, अशा अनेक ठिकाणी मूर्ती पाठवतात. त्यामुळे वेळेत मूर्ती देता यावी, यासाठी शहरातील काही कारखान्यांनी नवीन मूर्तींची बुकिंग बंद केली आहे. कारखान्यांच्या बाहेर तसे बोर्ड लावण्यात आले आहेत.

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.