Bhosari News : अशीही एक ‘अमूल्य’ भेट!

एमपीसी न्यूज – काही तरी करून दाखवण्याची उर्मी अंगी असली की परिस्थितीच्या झळा जाणवत नाहीत. अशाच एका घटनेचा प्रत्यय भोसरीत आला. ॲथलेटिक्सचा सराव करण्यासाठी एक विद्यार्थी मागील सहा महिन्यांपासून नेहरूनगर ते इंद्रायणीनगर पर्यंत पायी चालत, न चुकता मैदानावर पोहचायचा. आर्थिक परिस्थिती हलाकीची असलेल्या या विद्यार्थ्याला त्याच्या मित्रांनी एक ‘अमूल्य’ भेट देऊन आश्चर्याचा धक्का दिला.

गोष्ट आहे गणेश आठवले या वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्याची. गणेशला ॲथलेटिक्समध्ये करिअर घडवायचे आहे पण, घरीची आर्थिक परिस्थिती हलाकीची आहे. वडील खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतात तर, आई धुणीभांडी करते.

गणेशला सरावासाठी घरापासून (नेहरूनगर) संत ज्ञानेश्वर क्रिडा संकुल, इंद्रायणीनगर येथे जावे लागते. प्रवासासाठी पैसे नसल्याने तो हे अंतर मात्र पायी चालत पार करतो. दिवसातून दोनवेळा न चुकता तो मैदानावर सरावासाठी हजर असतो. पाऊस, ऊन असो की थंडी गणेश मैदानावर वेळेत पोहचतो.

गणेशला होत असलेल्या त्रास त्याच्या सोबत सराव करायला येणा-या इतर विद्यार्थ्यांना पहावत नव्हता. यावर त्यांनी तोडगा काढायचा ठरवला. सरावासाठी येत असलेल्या वैष्णवी भुरूंगे या विद्यार्थींनीने आपल्या मामाकडे असलेली जुनी सायकल होती ती मिळवली.

ती सायकल नादुरूस्त होती आणि दुरूस्तीसाठी खर्च येणार होता. खर्चाचे संपुर्ण पैसे देण्यासाठी प्रशिक्षक सावता जाधव यांनी तयारी दर्शवली, परंतु सर्व विद्यार्थ्यांनी यासाठी पुढाकार घेत प्रशिक्षकांसोबत आपल्या परीने मदतीचा हात पुढे केला. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सायकल दुरूस्तीसाठी येणारा खर्च वर्गणी रूपाने गोळा केला व सायकल दुरूस्त केली.

गणेशच्या नकळत हे सर्व सुरू होते. आज (सोमवारी, दि.27) सकाळी सर्व विद्यार्थी आणि प्रशिक्षक सावता जाधव यांनी गणेश आठवले याला ही सायकल भेट दिली. अनपेक्षित आणि आपल्या त्रासाची जाणीव असलेल्या सहका-यांनी दिलेली ही अमूल्य भेट पाहून गणेश भारावून गेला. त्यांनी सर्वांचे आभार मानले.

‘विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन त्याला मदत केली ही आनंदाची बाब आहे. गणेश मेहनती आहे, खेळाप्रती त्याचा ओढा आहे आणि प्रामाणिकपणे सराव देखील करतो.’ असे क्रिडा प्रशिक्षक सावता जाधव यांनी याप्रसंगी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.