Pimpri: दिल्लीत शेतक-यांवर झालेल्या लाठीमाराचा स्वराज अभियानाने केला निषेध 

एमपीसी न्यूज – राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्ती यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (दि.2)शेतक-यांनी दिल्लीत काढलेल्या मोर्चावर झालेल्या लाठीमारचा स्वराज अभियानाने निषेध केला आहे. 

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात स्वराज अभियानाचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी म्हटले आहे की, भाजपने 2014 मध्ये शेतक-यांना त्यांच्या उत्पादनावर दीडपट हमीभाव देऊ, शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी करू अशी आश्वासने दिली होती.  मात्र सत्तेवर येऊन साडेचार वर्षे झाली तरी या आश्वासनांची पूर्तता या सरकारने केली नाही.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, शेतक-यांची कर्ज माफ करा, दहा वर्षांपेक्षा अधिक जुन्या शेतीमाल वाहतूक करणा-या वाहनांवरील बंदी उठवा, किसान क्रेडीट कार्ड योजनेंतर्गत बिनव्याजी कर्ज द्या, शेतक-यांना पेन्शन योजना लागू करा या व अशा अनेक मागण्या घेऊन भारतीय किसान युनियनने किसान क्रांती यात्रा आयोजित केली होती. यामध्ये लाखो शेतकरी सहभागी झाले होते. परंतु, सरकारने गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या दिवशी (अहिंसा दिन) या शेतक-यांना कोंडीत पकडून त्यांच्यावर बळाचा वापर केला, हे निषेधार्ह आहे. शेतक-यांवर बळाचा वापर करणा-या भाजप सरकारचा तीव्र शब्दांत निषेध करतो, असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.