Pune News : 2 ते 9 डिसेंबर दरम्यान रंगणार पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, 150 हून अधिक चित्रपटांची मेजवानी

एमपीसी न्यूज – पुणे फिल्म फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात येणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पीफ) येत्या 2 ते 9 डिसेंबर दरम्यान भरविण्यात येणार आहे. 150 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी रसिकांना यानिमित्ताने अनुभवता येणार आहे. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. महोत्सवाचे हे 19 वे वर्ष आहे.

महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ. मोहन आगाशे, सतीश आळेकर आणि चित्रपट निवड समिती सदस्य अभिजित रणदिवे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र सरकाचा अधिकृत चित्रपट महोत्सव असलेला सदर महोत्सव याआधी मार्च 2021 मध्ये होणार होता, परंतु राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तो स्थगित करण्यात आला आणि काही निवडक चित्रपटांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला होता.

आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यावर राज्य सरकारने सिनेमागृह उघडण्याची परवानगी दिली आहे, त्यामुळे महोत्सव आता राज्य सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून चित्रपटगृहांमध्ये भरविता येणे शक्य असल्याने येत्या 2 ते 9 डिसेंबर, 2021 दरम्यान चित्रपट रसिकांना उत्कृष्ट दर्जाच्या चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. सुमारे 150 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी चित्रपट रसिकांना मिळणार आहे.

सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन, कॅम्प परिसरातील आयनॉक्स व लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय (एनएफएआय) येथे यंदा महोत्सवातील चित्रपट दाखवले जातील. महोत्सवात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी येत्या 18 नोव्हेंबर पासून सुरु होईल तर 22 नोव्हेंबरपासून महोत्सव होणाऱ्या तिन्ही चित्रपटगृहांमध्ये स्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध होणार आहे. संपूर्ण महोत्सवासाठीचे नोंदणी शुल्क रुपये 600 इतके आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.