Vadgaon Maval News : समाजाची उन्नती हाच अल्पसंख्याक विभागाचा खरा उद्देश – नवाब मलिक

एमपीसी न्यूज – समाजाची उन्नती हाच अल्पसंख्याक विभागाचा खरा उद्देश असून या विभागाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ गरजूपर्यंत पोहोचला पाहिजे. अल्पसंख्यांक समाजाची शैक्षणिक व व्यवसायिक प्रगती होणे आवश्यक आहे असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक म्हणाले.

मावळ तालुका राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष आफताब सय्यद, नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष पूजा वहिले, बाबूलाल नालबंद, आयुब सिकिलकर, पंढरीनाथ ढोरे, राजेंद्र कुडे, माया चव्हाण, विशाल वहिले, अतुल राऊत, अंकुश आंबेकर, नारायण ठाकर, आरिफ तांबोळी, अल्पसंख्याक महिलाध्यक्षा शबनम खान, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष मंगेश खैरे, सोमनाथ धोंगडे, मयुर गुरव आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारचा समाचार घेत मंत्री नवाब मलिक म्हणाले, केवळ दहशत निर्माण करण्यासाठी भाजपा केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून चौकशीचा खटाटोप करीत आहे. कितीही चौकशा करू द्या. त्यांच्या पोकळ धमक्यांना महाविकास आघाडी सरकार घाबरत नाही.

मलिक यांनी समाजातील प्रतिनिधींशी हितगुज केले. समीर वानखेडे हा भाजपचा म्होरक्या असून त्याची बोगसगिरी लवकरच जनतेसमोर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही, वानखेडेची वर्षभरात नोकरी जाईल व त्याला तुरुंगवास भोगावा लागेल, असे खुले आव्हान मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी बोलताना दिले.

बबनराव भेगडे म्हणाले, मावळ तालुक्यात राष्ट्रवादीने नेहमीच अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अल्पसंख्याक समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचेही सांगितले. यावेळी आयुब सिकिलकर व बाबूलाल नालबंद यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अतुल राऊत यांनी केले. आभार विशाल वहिले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.