Pimpri : आयुक्तांची सल्लागाराला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस, स्थायीने फक्त काम काढले

संतपीठाच्या प्रकल्प सल्लागाराला काळ्या यादीत नाही-

एमपीसी न्यूज –  टाळगाव चिखलीतील ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठासाठी नियुक्त ‘प्रकल्प सल्लागार आणि वास्तूविशारद’ मेसर्स नुयोग जबुवानी यांच्यावर महापालिका स्थायी समिती मेहेरबान झाली आहे. आयुक्तांनी काळ्यात यादीत टाकण्याची शिफारस केली असताना स्थायीने त्यांना काळ्या यादीतून हटविले. त्याबाबतचा  ठराव मंजूर करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ टाळगाव चिखली येथे उभारण्यात येत आहे. सुमारे 40 कोटी 61 लाख रुपयांच्या संतपीठ इमारत बांधकामासाठी महापालिकेतर्फे निविदा मागविण्यात आली.  बी. के. खोसे यांनी सादर केलेली निविदा स्वीकारण्याचा निर्णय 15 डिसेंबर 2018 रोजी घेण्यात आला. मंजूर दर, अधिक रॉयल्टी चार्जेस आणि मटेरिअल चार्जेस असा एकूण 45  कोटी 8 लाख 97 हजार 64  रुपये इतका खर्च संतपीठ उभारणीसाठी येणार आहे.

संतपीठाच्या विविध कामांसाठी सल्लागार व वास्तूविशारद म्हणून नुयोग शिवजी जबूवानी यांची नेमूणक 7 ऑगस्ट 2017 रोजी करण्यात आली. मात्र, त्यांच्याबाबत विविध तक्रारी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना प्राप्त झाल्या. त्याची नियुक्ती ही कामाच्या हिताच्या, तसेच दिलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना हटवून काळ्या यादीत टाकण्याचा आणि त्यांच्या जागी नवीन प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार व वास्तूविशारद नेमणूक करण्याचा निर्णय महापालिकेतर्फे घेण्यात आला.

नवीन वास्तूविशारद व प्रकल्प सल्लागार म्हणून निओजन आर्किटेक्टस व कन्सल्टंट यांची नेमूणक करण्यात आली. मात्र, महापालिका स्थायी समिती आता आधीचे प्रकल्प सल्लागार व वास्तूविशारद श्री नुयोग शिवजी जबूवाणी यांच्यावर मेहेरबान झाली आहे. महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी दिलेल्या काळ्या यादीत टाकण्याच्या प्रस्तावालाच त्यांनी आव्हान देत ‘नुयोग जबुवाणी यांना काळ्या यादीतून हटविले आहे. मात्र, संतपीठाचे वास्तूविशारद व प्रकल्प सल्लागार म्हणून मेसर्स निओजन आर्किटेक्टस व कन्सल्टंट हेच कामकाज करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.