Pimpri : उर्वरीत 46 स्पाईन रोड बाधितांना मिळणार भूखंड

एमपीसी न्यूज – तळवडे येथील त्रिवेणीनगर चौकातून जाणाऱ्या स्पाईन रस्त्यात बाधित होणाऱ्या रहिवाशांच्या रखडलेला पुर्नवसनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. 126 रहिवाशांपैकी उर्वरीत 46 लाभार्थींसाठी महापालिकेच्या वतीने आज (शुक्रवारी) सोडत काढण्यात आली.

तळवडे त्रिवेणीनगर येथील स्पाईन रस्त्याने बाधितांच्या पुनर्वसनासाठी पिंपरी-चिंचवड नवनगरविकास प्राधिकरणाकडून पेठ क्रमांक 11 मधील पर्यायी निवासी जागा मंजूर झाली आहे. 75 मीटर स्पाईन रस्त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 52 मीटर ते 60 मीटर रस्ता बाधितांच्या पुनर्वसनासाठी नगररचना विभागामार्फत 126 जणांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. त्यापैकी 77 लाभार्थ्यांची सोडत 27 ऑगस्ट 2018 रोजी काढण्यात आली होती.

उर्वरित 46 लाभार्थ्यांची सोडत आज मार्गी लागली. कृष्णानगर येथील स्वामी विवेकानंद क्रीडा संकुलात अतिरिक्त आयुक्त अजित पवार,  फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. महापालिकेच्या भूमी आणि जिंदगी विभागामार्फत लाभार्थ्यांना भूखंडाबाबत माहिती देत त्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.