Pimpri : इमर्सन कंपनीतील कायमस्वरूपी कार्यरत असलेल्या कर्मचा-यांचे डांबून ठेवून घेतले राजीनामे

पोलीस आयुक्तांकडे तक्रार करूनही अद्याप गुन्हे दाखल नाहीत; सोमवारपर्यंत कामावर रुजू करून घ्यावे; अन्यथा कंपनीच्या गेटवर बेमुदत आंदोलन

राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष कामगार नेते यशवंत भोसले यांचा इशारा; कामगार उप आयुक्तांच्या आदेशाला कंपनीकडून केराची टोपली

एमपीसी न्यूज – हिंजवडी येथील इमर्सन प्रोसेस मॅनेजमेंट इंडिया प्रा. लि. या कंपनीने कोणतीही पूर्वकल्पना न देता कंपनीत कायमस्वरूपी कार्यरत असलेले वाहन चालक आणि सुरक्षारक्षकांना कामावरून काढले आहे. या १९ कामगारांना खोलीत डांबून ठेवून त्यांना धमकावून आणि बळजबरीने राजीनाम्यांवर स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. त्यामुळे हे १९ कामगार बेरोजगार झाले असून त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. याबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार करूनही कंपनी प्रशासनावर अदयाप गुन्हे दाखल झालेले नाहीत. काढून टाकलेल्या कामगारांना तात्काळ कामावर रुजू करून घेण्यात यावे, अन्यथा सोमवारपासून कंपनीच्या गेटवर बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष कामगार नेते यशवंत भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. या कामगारांना कामावर रुजू करून घेण्याचे कामगार उप आयुक्तांचे आदेश असतानाही कंपनी व्यवस्थापनाकडून आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचे आरोप त्यांनी केला. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हिंजवडी येथील इमर्सन कंपनीने काढून टाकलेले कामगार मागील १२ वर्षांपासून पर्मनंट म्हणून काम करत आहेत. कामगारांनी केलेल्या प्रामाणिक सेवेबद्दल कंपनीने त्यांचा वेळोवेळी गौरव देखील केला आहे. असे असताना ७ जानेवारी २०२० रोजी कंपनी प्रशासनाने दुपारी सुरक्षारक्षक आणि वाहन चालकांना बोलावून घेतले. कंपनीच्या एका खोलीत बैठकीच्या नावाखाली डांबून ठेवले. कंपनीचे अधिकारी प्रकाश खेडेकर, संदीप महाजन, धनंजय लिंबेकर, युवराज पायगुडे, योगेश चव्हाण, डॉ. विजय जाधव, जगदीश यादव आदी त्यावेळी तिथे उपस्थित होते.

कामगारांचे मोबाईल फोन जमा करून घेतले. ‘आम्हाला कंपनीतील मॅन पॉवर कमी करायची आहे. त्यासाठी आज आत्ताच्या आत्ता हा टाईप केलेला राजीनाम्याचा ड्राफ्ट वाचा आणि कोऱ्या कागदावर तुमच्या हस्ताक्षरात राजीनामा लिहून द्या’ असे कंपनी प्रशासनाने कामगारांना धमकावले असल्याची तक्रार कामगारांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे केलेली आहे. कामगारांवर असलेली बँकांची कर्ज, त्यांच्या मुलाचे शिक्षण या सर्वांचा कोणताही विचार न करता कंपनीने हा मुजोरी निर्णय घेतला. कंपनीने आजवर झालेल्या नोकरीचा हिशोब करून त्याचे पैसे देण्यात येतील असे कंपनीने सांगितले.

याबाबत कामगार कंपनी प्रशासनासमोर गयावया करू लागले. त्यावर एच आर प्रमुख प्रकाश खेडेकर म्हणाले की, कंपनीने निर्णय घेतला आहे. तुम्हाला पाच मिनिटांचा वेळ देतो. नाहीतर तुमच्यावर चोरी करत असल्याची खोटी तक्रार पोलिसात देतो. तुम्ही पोलिसातून सुटून आल्यानंतर गुंडांचा वापर करून तुमचे आयुष्य उध्वस्त करू. गुंड तुमच्या घरात घुसून तुम्हाला ठोकून काढतील, अशी धमकीही खेडेकर यांनी दिल्याचे कामगारांनी सांगितले. आश्चर्य म्हणजे, अशी धमकी देऊनही पोलिसांनी संबंधितांवर अदयाप गुन्हा दाखल केलेला नसल्याचे समजते.

सुरक्षारक्षक तुकाराम सपकाळ यांनी सांगितले की, हा धक्का सहन न झाल्याने मला चक्कर आली. उपस्थित वैद्यकीय अधिका-यांनी माझ्यावर औषधोपचार केला आणि सर्व कामगारांकडून बळजबरीने राजीनामे लिहून घेतले. त्यानंतर खोलीचा दरवाजा उघडून कामगारांचे मोबाईल फोन परत केले. सुरक्षा अधिकारी जगदीश यादव यांनी गेटवर राजीनामे घेतलेल्या कामगारांचे गणवेश आणि ओळखपत्र जबरदस्तीने काढून घेतले.

‘कामगार घरी जाताना जीव देतील. ते कंपनीच्या अंगलट येईल. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरी सोडून या’, असे म्हणत कंपनीचे अधिकारी धनंजय लिंबेकर यांनी तीन कंपनीच्या टुरिस्ट गाड्यांमधून कामगारांना कामगारांच्या घरी सोडण्यास सांगितले. कामगारांना कंपनीतून काढून टाकल्याचे कंपनीने संबंधीत बँकांना कळवले. त्यामुळे बँकांनी कामगारांच्या खात्यावर जमा असलेली कर्जाची पूर्ण रक्कम काढून घेतली. अचानक आलेल्या या बेरोजगारीच्या कु-हाडीमुळे आम्हा कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे.”

कंपनी प्रशासनाने जबरदस्तीने धमकावून घेतलेले राजीनामे ताब्यात घेऊन कंपनी प्रशासनावर कारवाई करावी, असे तक्रार अर्जात कामगारांनी नमूद केले आहे. याबाबत राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या माध्यमातून कामगार उप आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली. त्यावर सहाय्यक कामगार आयुक्तांनी आदेश दिले की, कामगारांनी त्यांच्या स्वखुशीने राजीनामे दिलेले नाहीत. त्यामुळे कामगारांच्या मागणीनुसार कामगारांना कामावर रुजू करून घ्यावे. तसेच औद्योगिक शांतता अबाधित राहील याची काळजी घ्यावी, असे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाला देखील कंपनी प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी कंपनीतील संबंधित अधिका-यांना बोलावून बैठक घेतली. सहाय्यक कामगार आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले असता त्यावर देखील कंपनी प्रशासनाने कोणतीही अंमलबजावणी केलेली नाही. उद्योगपती असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत का? याबाबत शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शनिवार पर्यंत कंपनीने कामगारांना कामावर रुजू करून घेतले नाही, तर सोमवार (दि. १०) पासून कंपनीच्या गेटवर बेमुदत आंदोलन करणार असल्याचा इशारा कामगार नेते यशवंत भोसले यांनी दिला आहे. तसेच याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

कामगारांना झाले अश्रू अनावर

कामगार नेते यशवंत भोसले यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी इमर्सन कंपनीने अचानक कामावरून काढलेले सुरक्षारक्षक आणि वाहन चालक उपस्थित होते. त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता कामगारांना अश्रू अनावर झाले. अनेक कामगारांनी कंपनीने केलेल्या अन्यायाबाबत बोलताना आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आमच्या कुटुंबाचे काय होणार, काहीही चूक नसताना कंपनीने हा अन्याय केला आहे. कामावरून काढून टाकण्यासह कंपनीने धमकावून आयुष्य उध्वस्त करण्याची धमकी देखील दिली आहे. कंपनीच्या पडत्या काळात कामगारांनी साथ दिली. जीवाचे रान करून कंपनीसोबत राहिलो. आता कंपनीचा विस्तार झाल्यानंतर कंपनी कामगारांवर, असे अन्यायकारक धोरण अवलंबित असल्याचे कामगारांनी सांगितले.

याबाबत कंपनीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता फोनवरील अधिका-यांनी संबंधितांचा संपर्क देण्यास तसेच माहिती देण्यास नकार दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.