Chinchwad : समृद्ध भारत निर्मितीची जबाबदारी स्वावलंबी नारीशक्ती आणि युवा शक्तीवर – प्रकाशराव मिठभाकरे

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील स्वामी विवेकानंद स्वावलंबन केंद्राच्या वतीने राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत शिलाई मशीन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पन्नास महिलांना राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाचे प्रकाशराव मिठभाकरे यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

याप्रसंगी केंद्राचे प्रमुख बालाजी मोरे व युवा उद्योजक प्रशांत गायकवाड तसेच प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सामाजिक कार्यकर्ते बालाजी मोरे यांनी सेवावस्तींमधील महिला तसेच युवक युवतींना व्यवसायाभिमुख कौशल्य प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करण्याच्या हेतूने 2011 साली स्वामी विवेकानंद केंद्राची स्थापना केली असून आजवर शेकडो युवक युवती वेगवेगळ्या विषयाचे प्रशिक्षण घेऊन यशस्वीपणे आपला व्यवसाय करत स्वता:च्या पायावर उभे आहेत.

आज स्वामी विवेकानंद केंद्राच्या राज्यात सात उपशाखा कार्यरत असून 3000 प्रशिक्षणार्थी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घेत आहेत. अनेक अडचणींवर मात करीत अविरत सुरु असलेल्या बालाजी मोरे यांच्या सेवाकार्याचे मिठभाकरे यांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले कीं आदर्शवत व स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी सुसंस्काराची आवश्यकता असते. स्वावलंबन हा एक महत्वाचा संस्कारच आहे. स्वामी विवेकानंद स्वावलंबन केंद्र हे कौशल्य विकास प्रशिक्षणाबरोबर संस्कार रूजवून समृद्ध भारत निर्मितीच्या कार्यात योगदान देत आहे. उद्योजक प्रशांत गायकवाड यांनी तसेच प्रशिक्षाणार्थी महिलांनी मनोगत व्यक्त केले. तर केंद्र प्रमुख बालाजी मोरे यांनी प्रस्ताविक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.