दाभाडे घराण्याची शाही शस्त्रपूजा, श्रीमंत सरदार सत्यशीलराजे दाभाडे यांच्या मुलाखतीतून….

एमपीसी न्यूज – हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी, त्याच्या रक्षणासाठी आणि सत्ताविस्तरासाठी मराठ्यांची अनेक शस्त्रे शत्रुंवर तळपली. काही शस्त्रे मराठा राज्यातील शुरवीरांमुळे अजरामर देखील झाली. खंडेनवमीला या शस्त्रांचे पूजन केले जाते. तळेगाव दाभाडे येथील दाभाडे राजघराण्यात देखील स्वराज्याच्या रक्षणासाठी तळपलेली काही शस्त्रे आहेत. त्या शस्त्रांचे पूजन दरवर्षी केले जाते. दाभाडे घराण्याच्या शाही शस्त्रपूजेबद्दल जाणून घेऊयात दाभाडे राजघराण्याचे 13वे वंशज श्रीमंत सरदार सत्यशीलराजे दाभाडे यांच्या मुलाखतीतून….

प्रश्न : दाभाडे राजघराण्यात कोणत्या शस्त्रांची पूजा केली जाते ?

उत्तर : सर्वप्रथम कट्यारीची पूजा केली जाते. सर्व शस्त्रांच्या पूजेमध्ये कट्यारीचा मान पहिला असतो. कोणतेही शस्त्रपूजन असले तरी दाभाडे घराण्यात कट्यार ही आद्य आहे.

प्रश्न : दाभाडे घराण्यातील कट्यारीचा इतिहास काय आहे ?

उत्तर : श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज हे एके दिवशी शिकारीवर गेले होते. त्यावेळी दाभाडे घराण्याची दुसरी पिढी येसाजीराव दाभाडे हे देखील महाराजांसोबत होते. शिकारीवर असताना एक रानडुक्कर महाराजांच्या दिशेने धावत येत असल्याचे येसाजीराव यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ त्यांच्या कंबरेला असलेल्या कट्यारीने त्या रानडुक्कराला मारले.

हे साहस पाहून श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी येसाजीराव यांना त्यांच्या अंगरक्षकांच्या तुकडीत सामील करून घेतले. नंतर येसाजीराव यांची ओळख महाराजांचे एक अत्यंत ‘विश्वासू अंगरक्षक’ म्हणून झाली.

दाभाडे घराण्याच्या जरीपटका झेंड्यावर कट्यारीला मान देण्यात आला आहे. दाभाडे घराण्यात कुठल्याही शस्त्रपूजे अगोदर कट्यार पुजली जाते.

पावनखिंडीच्या प्रसंगात शिवाजी महाराजांसोबत येसाजी दाभाडे देखील होते. दिग्पाल लांजेकर यांच्या जंगजोहर या चित्रपटात याचे चित्रण दाखवण्यात आले आहे.

प्रश्न : कट्यारीसोबत अन्य कोणती शस्त्रे पुजली जातात ?

उत्तर : कट्यारीसोबत सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची तलवार देखील पुजली जाते. त्यासोबत इतर शस्त्रांची पूजा केली जाते. तलवारीसह अन्य शस्त्रांना मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो.

प्रश्न : सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या तलवारीचा काय इतिहास आहे ?

उत्तर : सरसेनापती सरदार खंडेराव दाभाडे यांच्या या तलवारीमध्ये 18 धातूंचा वापर करण्यात आलेला आहे. त्यात लोखंडाचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही तलवार दुधारी असून तिची पूर्ण लांबी 50 इंच एवढी आहे. या तलवारीचे पाते 39 इंच असून नख्यापासून गजापर्यंतची लांबी 14 इंच आहे. तलवारीच्या पातीवर तलवार तयार करणार्‍या कंपनीच्या खुणा आहेत. तलवारीच्या पात्याच्या दोन्ही बाजूंना दोन खोल रेघा (नाळ) असून तलवारीची मूठ मराठा तलवारीच्या पध्दतीची आहे. मूठीच्या मागील बाजूस गज असून लढाईच्या वेळी दोन्ही हातांनी तलवार पेलण्यासाठी तसेच पाठीमागील शत्रुला भोकसण्यासाठी त्याचा वापर करण्यात येत असे.

ही तलवार स्पेन देशातील ‘टोलेडो’ या गावी तयार झाली असून इसवी सन 1691 पासून या घराण्यात आहे. ही तलवार “धोप” या नावाने संबोधली जाते.

खंडेराव दाभाडे यांनी जिंजीच्या प्रवासात हे तलवार स्वतःसोबत बाळगली होती. ही तलवार 1732 ला अहमदाबादच्या स्वारीत झोरावर खान बाबीचा पराभव करण्यासाठी ‘सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे’ यांनी स्वतःजवळ बाळगली व वापरली सुध्दा होती.

प्रश्न : सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची तलवार आपल्याला कशी मिळाली ?

उत्तर : तलवारीचा तीन शतकांहून अधिक काळाचा प्रवास आहे. पुर्वी ही तलवार ‘तळेगांव दाभाडे’ येथील जुन्या राजवाड्यांच्या देवघरात ठेवण्यात आली होती. पुढे सरसेनापती दाभाडे राजघराण्याचे 11वे वंशज ‘श्रीमंत सरदार विजयसिंहराजे दाभाडे’ यांनी पुण्याला त्यांच्या राजवाड्यात आणली. नंतर ही तलवार त्यांचे पुत्र ‘श्रीमंत सरदार पद्मसेनराजे विजयसिंहराजे दाभाडे’ यांच्या कडे होती. आज ही तलवार पद्मसेनराजे यांचे पुत्र व सरसेनापती दाभाडे राजघराण्याचे 13वे वंशज श्रीमंत सरदार सत्यशीलराजे दाभाडे म्हणजेच माझ्या खासगी संग्रही आहे.

प्रश्न : ‘मराठ्यांचे शस्त्रागार’ याबाबत काय सांगाल ?

उत्तर : हो, ‘मराठ्यांचे शस्त्रागार’ नावाचे प्रदर्शन मागील वर्षी पुण्यात भरवण्यात आले होते. तीन दिवसात तब्बल पाच लाख लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. अभूतपूर्व प्रतिसाद देत पुणेकरांनी मराठ्यांच्या शास्त्रागाराची माहिती जाणून घेतली. यावेळी सुमारे 28 ऐतिहासिक घराणे एकत्र आले होते. माझ्या संकल्पनेला श्रमिक गोजमगुंडे यांनी मूर्त रूप दिले होते.

प्रश्न : नागरिकांना काय संदेश द्याल ?

उत्तर : नागरिकांसाठी संदेश असं काही नाही म्हणता येणार. पण नवरात्री आणि दस-याच्या निमित्ताने महिलांना जरूर सांगेन की, नवरात्रीमध्ये नऊ दिवस ज्याप्रमाणे वेगवेगळ्या रंगाचे पेहराव करता. त्याच प्रमाणे स्वसंरक्षणासाठी नऊ दिवस नऊ हत्यारांची माहिती घ्या. नऊ दिवस नऊ हत्यारे चालवायला शिका. आपल्या इतिहासाच्या पानापानात स्त्रीच्या गौरव गाथा आहेत. देशाला घडवण्यात महिलांची खूप मोठी भूमिका आहे.

वृषालीराजे दाभाडे यांनीही याबाबत बोलताना सांगितले की, महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेणे ही काळाची गरज बनली आहे. पुरुषी अहंकाराची मानसिकता बदलायला हवी. झाशीची राणी, जिजाबाई, येसूबाई, सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे यांच्यासह अनेक महिलांनी इतिहास घडवला आहे. उज्वल भविष्याचा वेध देखील महिलांनी घेतला आहे. वर्तमानात त्यांना सुरक्षित आणि सन्मानाचे वातावरण निर्माण करायला हवे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.