Katraj : राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील सर्पोद्यान व वन्य प्राणी अनाथालयाचे देखभालीचे काम पुन्हा भारतीय सर्पविज्ञान संस्थेकडे

एमपीसी न्यूज : कात्रज येथील महापालिकेच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील सर्पोद्यान व वन्य प्राणी अनाथालय या विभागाचे देखभालीचे कामकाज पुन्हा तीन वर्षांसाठी भारतीय सर्पविज्ञान संस्थेस देण्यात येणार आहे. पालिका प्रशासनाने नुकतेच यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून स्थायी समितीपुढे ठेवला आहे.

कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात भारतीय सर्पविज्ञान संस्था सर्पोद्यान व प्राणी अनाथालयाची ऑगस्ट २०१५ पासून देखभाल करत असून ऑगस्ट २०१८ मध्ये त्यांच्यासोबतचा करार संपुष्टात आला होता. मात्र, प्रशासनाने वेळेत प्रस्ताव दाखल न केल्याने करारवाढीची प्रक्रिया रखडली होती. आता हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

सर्पोद्यान व प्राणी अनाथालय त्याचाच एक भाग आहेत. दरवर्षी १८ लाख नागरिक याठिकाणी भेट देत असून मागील आर्थिक वर्षात प्रवेश शुल्कातून पालिकेला ४ कोटी २६ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. सर्पोद्यानातील कर्मचारी, प्राण्यांचे खाद्य, पिंजरे देखभाल दुरूस्ती, औषधे, सुरक्षा साधने यासाठी ६२ लाख २२ हजार रुपये खर्च असून महापालिका यापैकी ५० टक्के रक्कम देणार आहे. तर वन्य प्राणी अनाथालयाचा खर्च ८२ लाख ३० हजार रुपये असून यापैकी ४७ लाख ७७ हजार रुपये महापालिका भारतीय सर्पविज्ञान संस्थेला देणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.