Covid Vaccine : सप्टेंबरमध्ये सीरमची दुसरी कोविड लस बाजारात येणार !

एमपीसी न्यूज : सप्टेंबर २०२१ पर्यंत पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने (एसआयआय) निर्मिती केलेली आणखी एक कोरोना प्रतिबंधक लस भारतीय बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता आहे. कोवोवॅक्स असे नव्या लसचे नाव असेल.

सध्या भारतात अॅस्ट्राझेंका आणि सीरम यांनी संयुक्तपणे निर्मिती केलेली कोविशिल्ड ही एक कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. तसेच हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीने आयसीएमआरच्या मदतीने तयार केलेली कोवॅक्सिन ही दुसरी कोरोना प्रतिबंधक लस देशात उपलब्ध आहे. कोवोवॅक्स उपलब्ध झाल्यानंतर भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसची संख्या तीन होईल.

अमेरिकेतील नोवावॅक्स इंक आणि सीरम संयुक्तपणे कोवोवॅक्स या लसची निर्मिती करत आहेत. या लसची निर्मिती सीरमच्या पुण्यातील फॅक्टरीत मोठ्या प्रमाणावर होणार आहे. सध्या कोवोवॅक्स या लसची भारतात चाचणी सुरू आहे. प्रयोग यशस्वी झाल्यास सप्टेंबर २०२१ पासून लसची निर्मिती करुन ती भारतीय बाजारात दाखल केली जाईल.

कोवोवॅक्स या लसचे आफ्रिकेत आणि इंग्लंडमध्ये झालेले प्रयोग ८९ टक्के यशस्वी झाले. आधी लस जून २०२१ पर्यंत आणण्याचे नियोजन होते. मात्र प्रयोगांना वेळ लागत असल्यामुळे निर्मितीचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले. नव्या नियोजनानुसार सप्टेंबर २०२१ पर्यंत कोवोवॅक्सची निर्मिती सुरू होईल आणि ही लस भारतीय बाजारात उपलब्ध होईल.

भारतासह निवडक देशांमध्ये कोवोवॅक्सच्या विक्रीची जबाबदारी सीरम सांभाळेल तर आर्थिकदृष्ट्या प्रगत असलेल्या देशांमध्ये कोवोवॅक्सच्या विक्रीची जबाबदारी अमेरिकेतील नोवावॅक्स इंक ही कंपनी सांभाळणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.