Weekend Lockdown News : सायंकाळी सहापासून दुसरा विकेंड लॉकडाऊन; केवळ दूध विक्री सुरु राहणार

दुध विक्री वगळता जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही राहणार बंद

एमपीसी न्यूज – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 1 मे सकाळी सातपर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. शनिवार आणि रविवार वगळता इतर दिवशी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी आहे. राज्यात आज (शुक्रवार, दि. 16) सायंकाळी सहापासून सोमवारी (दि. 19) सकाळी सात वाजेपर्यंत दुसरा विकेंड लॉकडाऊन असेल. या कालावधीत केवळ दूध
विक्री सुरु असून त्याव्यतिरिक्त सर्व बाबी बंद असणार आहेत.

विकेंड लॉकडाऊन मध्ये सकाळी सहा ते सकाळी अकरा वाजेपर्यंतच दुध विक्री करता येणार आहे. त्यानंतर दुध विक्री देखील बंद राहणार आहे.

सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास परवानगी आहे. गृह्सेविका, घरेलू कामगार, वाहन चालक यांना सर्व दिवस सकाळी सात ते रात्री दहा या कालावधीत कामावर जाण्यास मुभा आहे. याच वेळेत स्वयंपाकी, ज्येष्ठ नागरिक, घरी आजारी असणा-यांना सेवा देणारे वैद्यकीय मदतनीस, परिचारिका यांना देखील सूट देण्यात आली आहे.

शासनाने संचारबंदी जाहीर केली असून या संचारबंदीत देखील नागरिकांचा मुक्त संचार असल्याचे पहायला मिळत आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांसह खासगी कार्यालयातील कर्मचारी देखील संचारबंदीच्या काळात वेगवेगळ्या कारणाने बाहेर पडत आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी संचारबंदीच्या काळात काही टप-या सुरु असून त्या टप-यांवर चहा पिणारे, रस्त्याच्या बाजूला गप्पा मारत बसणारे तसेच विनाकारण घराबाहेर पडणारे नागरिकही आढळून आले. नागरिकांचा हा मुक्त संचार चांगलाच अंगलट येत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून वाढता संसर्ग नियमभंग करणा-या नागरिकांमुळे अधिक वाढत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.