Chikhali :नामांतरावरून सत्तारूढ पक्षनेत्यासमोर ‘घरकुल’ नागरिकांची घोषणाबाजी

एमपीसी न्यूज – घरकुलाच्या नामांतरावरून सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यासमोर घरकुलमधील नागरिकांनी विरोध दर्शवत घोषणाबाजी केली.

याबाबत फेडरेशन ऑफ घरकुल यांच्या वतीने चिखली पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार घरकुल येथे वैयक्तिक कामासाठी आले होते. यावेळी भारतीय सेनेतून निवृत्त झालेले ज्येष्ठ नागरिक रघुनाथ सावंत यांच्याशी घरकुल नामकरणासंदर्भात चर्चा करत होते. यावेळी घरकुलमधील नागरिकांनी एकनाथ पवार यांच्यासमोर घोषणाबाजी केली.

घरकुलच्या नामकरणामुळे भविष्यात घरकुलमध्ये राहणा-या नागरिकांमध्ये जातीय सलोखा बिघडविण्याचा डाव काही लोकप्रतिनिधी करत आहेत, असा आरोप देखील निवेदनात करण्यात आला आहे.

याबाबत एकनाथ पवार म्हणाले, “घरकुल येथील नागरिकांचा स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाला विरोध आहे. घरकुलचे काम सुरु असताना त्याला नाव देण्यासाठी कोणत्याही कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला नाही. स्थानिक नगरसेवकांनी महापालिकेत साधे निवेदन देखील दिले नाही. त्यामुळे घरकुलला स्व. गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्यात आले. स्थानिक नागरिकांनी त्यांचा विरोध योग्य त्या मार्गाने प्रदर्शित करावा. त्यात मी काहीही मदत करू शकत नाही. आज जो प्रकार झाला, त्या ठिकाणी सर्व पक्षांचे राजकीय कार्यकर्ते होते. यावरून विरोधकांना राजकारण करायचे आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.