Bhosari : पुलाखालील सेवा रस्ते ‘अर्बन स्ट्रीट डिझाईन’नुसार विकसित करणार

 30 कोटींचा खर्च, स्थायी समिची आयत्यावेळी मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरीतील उड्डाणपुलाखालील सेवा रस्ते ‘अर्बन स्ट्रीट डिझाईन’नुसार विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे पादचा-यांना पदपथावरुन चालणे सुलभ होणार आहे. सायकल ट्रॅक, पदपथ, नियोजनबद्ध वाहनतळ, शहर, एसटी बस थांबे, फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र नियोजनबद्ध आराखडा केला जाणार आहे. यासाठी 29 कोटी 94 लाख रुपये खर्च येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

महापालिका क्षेत्रात पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरीत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने महापालिकेमार्फत या रस्त्यास शितलबाग ते धावडेवस्तीपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. पुलामुळे वाहतूक कोंडी सुटेल अशी अपेक्षा होती. तथापि, भोसरी गावठाणातील वाहतूक सेवेचा थांबा, आळंदीकडे, दिघीकडे जाणारा रस्ता, विविध व्यावसायिक, एसटी बसचा थांबा, खासगी वाहने यामुळे पुलाखालील वाहतूक कोंडी कमी झाली नाही.

उड्डाणपुलाखालील अनधिकृत पार्किंग, पथारीवाले, हातगाड्या, व्यावसायिकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. फुटपाथवर व्यावसायिक, पथारी, हातगाड्यांनी अतिक्रमण केले असल्याने पादचा-यांना चालणे मुश्किल झाले असून वाहतूक कोंडीत भर पडत होती.

आता या भागातील पादचा-यांचा, नागरिकांच्या सोईच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने उड्डाणपुलाखालील सेवा रस्ते अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्यात येणार आहेत.  त्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती. निविदा रक्कम 31 कोटी रुपयांची होती. रॉयल्टी व मटेरियल चार्जेस वगळून 30 कोटी 74 लाख रुपयांचे दर मागविण्यात आले होते.

एस.एस.साठे, धनेश्वर कन्स्ट्रक्शन आणि व्ही.एम.मातेरे इन्फ्रा या तीन ठेकेदारांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला.  त्यामध्ये एस.एस.साठे या ठेकेदाराची निविदा रकमेच्या 31 कोटी मधून रॉयल्टी व मटेरीयल टेस्टींग चार्जेस वगळून 30 कोटी पेक्षा 3.56 टक्के कमी दराची निविदा आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी (दि.17) ही निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली. त्यानुसार एस.एस.साठे या ठेकेदाराकडून रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग चार्जेससह 29 कोटी 94 लाख रुपयांमध्ये हे काम करुन घेण्यात येणार आहे. त्यानुसार त्यांच्यासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

‘असे’ होणार फायदे!

पदपथ समपातळीत व विनाअडथळा असल्याने शहरातील सर्व घटकांसाठी सुरक्षित
विशेषत लहान मुले, दिव्यांग व वयोवृद्धांसाठी सुरक्षित
नागरिकांसाठी सार्वजनिक बैठक व्यवस्था असल्याने आनंदमयी वातावरण
वाहन व्यवस्था, स्थानिक व शहराशी जोडणारी सुलभा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
सुलभ वाहतूक व्यवस्थेमुळे कमीत कमी वायू, ध्वनी प्रदूषण

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.