Eknath Shinde : लोकसभेतील गटनेतेपदाबाबत शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दिली कागदपत्रे

एमपीसी न्यूज – शिवसेनेतील 12 खासदारांनी शिंदे गटात सहभाग नोंदविल्यानंतर शिवसेनेच्यावतीने खासदार संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका मांडली होती. लोकसभेतील शिवसेना पक्षाच्या गटनेता बदलण्याच्या प्रक्रियेला संजय राऊत यांनी आव्हान दिले होते.कारण, शिवसेनेचा नवा गटनेता शिंदे गटाचा दाखविण्यात आला आहे.आता लोकसभेच्या गटनेता संदर्भातील कागदपत्र शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहेत.

 

2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विनायक राऊत यांची लोकसभेतील पक्षनेतेपदी नियुक्ती केली होती.संजय राऊत यांची राज्यसभेतील नेतेपदी तसेच दोन्ही सभागृहात सदस्य असलेल्या शिवसेनेच्या संसदीय पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. खासदार संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन एकनाथ शिंदे गटातील 12 बंडखोर खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती.

 

शिंदे गटाने राहुल शेवाळे यांची नेते आणि पाचवेळा खासदार असलेल्या भावना गवळी यांना पक्षाचे प्रतोद घोषित केले होते. राहुल शेवाळे यांना लोकसभेतील शिवसेनेचे नेते म्हणून सभापतींनी मान्यता दिली होती. याबाबतचे कागदपत्र सोमवारी (दि.8) शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले आहे.

 

याउलट उध्दव ठाकरे गटाकडून कागदपत्रे सादर करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ मागून घेण्यात आला आहे.लोकसभा गटनेता संदर्भातील कागदपत्र शिंदे गट व उध्दव ठाकरे गट यांना मंगळवारी दुपारी तीनपर्यंत कागदपत्र सादर करण्यास सांगण्यात आले होते. कारण, संजय राऊत यांनी लोकसभेतील गटनेतेपदाला आव्हान दिले होते.

 

तोपर्यंत आयोगाने निर्णय घेऊ नये

शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे चार आठवड्यांचा वेळ कागदपत्र आणि पुरावे सादर करण्यासाठी मागितला आहे. सुप्रीम कोर्टाकडून निकाल येईपर्यंत आयोगाने निर्णय घेऊ नये, अशी विनंतीही ठाकरे गटाने केली आहे. शिवसेना मोठा प्रादेशिक पक्ष असल्याने कागदपत्रे आणि पुरावे गोळा करण्यास वेळ लागत असल्याचे सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.