Bhosari : इंद्रायणीनगर मधील भाजी मंडई आणि स्केटींग ग्राऊंडचे नामकरण करून उद्घाटन करावे – विक्रांत लांडे

 एमपीसी न्यूज –   भोसरीतील इंद्रायणीनगर प्रभाग ८ मधील भाजी मंडई आणि स्केटींग ग्राऊंडचे नामकरण करून उद्घाटन करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक विक्रांत लांडे यांनी केली आहे. पिंपरी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लांडे यांनी याबाबत निवेदन दिले आहे.

विक्रांत लांडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलयं की, पिंपरी चिंचवड शहर हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रगत औद्योगिक शहर म्हणून पिंपरी चिंचवडला ओळखले जाते. महापालिकेच्या वतीने इंद्रायणीनगर येथे नव्याने झालेल्या भाजीमंडईचे काम गेली अनेक वर्षापासून पुर्ण झालेले असून येथील भाजीमंडई वापराविना पडून राहिलेली आहे. यामुळे येथील भाजीमंडई जुगाराचा व दारूचा अड्डा बनली आहे. या भाजीमंडईचे लवकरात लवकर उद्घाटन केल्यास या परिसरातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच येथील स्केटींग ग्राऊंडचे काम देखील पुर्णत्वास आले असल्यामुळे या ग्राऊंडचे नामकरण व उद्घाटन करणे गरजेचे आहे. या भाजीमंडईला संत तुकाराम महाराज भाजी मंडई आणि स्केटींग ग्राऊंडला संभाजी महाराज स्केटींग ग्राऊंड असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी विक्रांत लांडे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.