Pune : ‘सायकलींचं पुणं’मधून पर्यावरण संवर्धनाचा नारा

लोकबिरादरी मित्र मंडळातर्फे 'आठवणीतलं पुणं...सायकलींचं पुणं' दाखवणारी 'पुणे सायक्लोथॉन'

एमपीसी न्यूज – ‘सायकल चालवा… आरोग्य टिकवा’, ‘सायकल चालवा… आयुष्य वाढवा’, ‘सायकल चालवा… पर्यावरण वाचवा’, ‘क्लीन पुणे… ग्रीन पुणे… सायकलींचे पुणे’, ‘झाडे लावा… झाडे जगवा’, ‘सायकल वापरा… प्रदूषण टाळा’ अशा घोषणा देत ‘सायकलींचं पुणं’ शहरातील रस्त्यावर अवतरलं. त्यातून प्रदूषणमुक्ती, पर्यावरण संवर्धनाचा नारा देत पुणेकरांनी सायकल स्वारी केली. त्यामुळे शहरातील टिळक, फर्ग्युसन, भांडारकर, गणेशखिंड, सेनापती बापट, कर्वे रस्ता यासह इतर प्रमुख रस्ते सायकलमय झाले.
निमित्त होते, लोकबिरादरी मित्र मंडळ ट्रस्ट, पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि शिक्षण प्रसारक मंडळीचे स. प. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आठवणींचं पुणं…सायकलींचं पुणं’ या संकल्पनेवर आधारित दुसऱ्या ‘पुणे सायक्लोथॉन’चे. रविवारी सकाळी झालेल्या या पुणे सायक्लोथॉनला हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे अनिकेत आमटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप,  स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ यांनी ध्वज दाखवत प्रारंभ केला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. प्रभाकर देसाई, लोकबिरादरी मित्र मंडळ ट्रस्टचे शिल्पा तांबे, योगेश कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
ही सायक्लोथॉन २१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा तीन अंतराच्या मार्गावर धावली. पहिला मार्ग (२१ किलोमीटर) स. प. महाविद्यालयापासून अलका टॉकीज, फर्ग्युसन महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, गणेशखिंड रस्ता, पुणे विद्यापीठ, पाषाण, बावधन, चांदणी चौक, पौड रस्ता, कर्वे रस्ता, अलका टॉकीज, स. प. महाविद्यालय, तर दुसरा मार्ग (१० किलोमीटर) स. प. महाविद्यालय गुडलक चौक, फर्ग्युसन महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, गणेशखिंड रस्ता, चतुःशृंगी मंदिर, सेनापती बापट रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता, अलका टॉकीज, स. प. महाविद्यालय आणि तिसरा मार्ग (५ किलोमीटर) शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी होता. हा मार्ग स. प. महाविद्यालय, गुडलक चौक, भांडारकर रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता, अलका टॉकीज, स. प. महाविद्यालय असा होता. हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या समीक्षा आमटे आणि ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर हेदेखील २१ किलोमीटरच्या रॅलीत सहभागी झाले होते.
सहा वर्षाच्या मुलापासून तर ९१ वर्षाच्या आजोबांपर्यंत जवळपास १२०० सायकलस्वारांनी यात सहभाग घेतला. त्यामध्ये प्रोफेशनल सायकलिंग ग्रुप्स, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी अशा सर्वच वर्गातील लोक सहभागी झाले होते. ज्येष्ठ नागरिक, सर्वात छोटा सायकलस्वार, मोठा गट, चांगला मेसेज असे सन्मानही यावेळी झाले. विविध गटातील सायकलस्वारांना यावेळी गौरविण्यात आले. सायकलींचे पुणे अशी ओळख असलेल्या पुण्यात पुन्हा सायकली धावाव्यात व पर्यावरण रक्षणासाठी आपले योगदान द्यावे, या उद्देशाने या सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आल्याचे योगेश कुलकर्णी व शिल्पा तांबे यांनी सांगितले. ३०० पेक्षा अधिक स्वयंसेवकांनी या रॅलीचे संयोजन केले.
डॉ. नितीन करमळकर म्हणाले, “सायकल चालविल्याने प्रदूषण कमी करण्यास मदत होतेच. शिवाय शरीराचा व्यायामही होतो. त्यामुळे सामाजिक आणि व्यक्तिगत स्वास्थ्य चांगले राहते. विद्यापीठाने पर्यावरणपूरक उपक्रम नेहमीच हाती घेतले असून, अधिकाधिक लोकांनी सायकल चालविण्यासाठी आम्ही जनजागृती करत आहोत.”
डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “सायकलचा वापर पुन्हा नियमित व्हावा, यासाठी प्रसार-प्रचार होणे गरजेचे आहे. या उपक्रमातून ते होत आहे. सायकल शेअरिंगसारखा उपक्रम पुणे महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीने राबविला आहे. यामुळे शहरातील वाहतुकीवरचा ताण कमी होण्यासाठी आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे.”
प्रा. दिलीप शेठ  म्हणाले, “सायकलींचा पुन्हा एकदा वापर वाढून पर्यावरण संवर्धनात योगदान द्यावे, प्रदूषण आणि इंधनावरील खर्च टाळावा, यासाठी सायकल वापरायला हवी. उत्तम आरोग्यासाठी आणि छोट्या अंतरासाठी सायकलचा वापर व्हावा.”
अनिकेत आमटे म्हणाले, “अशा प्रकारचा अनोखा उपक्रम राबवून सायकल वापरण्याबाबत जनजागृती होत आहे, याचा आनंद आहे, अधिकाधिक लोकांनी सायकल वापरावी. हा उत्साह आणि ऊर्जा रोजच्या सायकल वापरातही दिसावी.”  काही ज्येष्ठ नागरिक यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत सायकल वापरण्यासाठी प्रेरित केले.

https://www.youtube.com/watch?v=vduVmOcxbB4&feature=youtu.be

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.