Pimpri : नदी प्रदूषण रोखण्यास गणेश भक्तांचा उस्फूर्त प्रतिसाद

पिंपरीगावातील हौदात 15 हजारांहून जास्त गणेश मूर्तींचे विसर्जन

एमपीसी न्यूज – पिंपरी गावातील वैभवनगर येथे विजय आसवानी यांच्या संकल्पनेतून आसवानी असोसिएटस्‌ आणि ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंट या संस्थेच्या वतीने सलग दुस-या वर्षी खासगी जागेत गणेश मूर्ती विसर्जनासाठी उभारण्यात आलेल्या तीन हौदात गुरुवारी (12 सप्टेंबर) दुपारपर्यंत 15 हजारांहून जास्त गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. संयोजनात उद्योजक राजू आसवानी, श्रीचंद आसवानी अनिल आसवानी व विजय आसवानी यांनी सहभाग घेतला. 

गणेश चतुर्थीला सोमवारी (2 सप्टेंबर) गणेश भक्तांनी मनोभावे गणपतीची स्थापना केली. मंगळवारी (3 सप्टेंबर) दुपारपासून दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन सुरु झाले. मंगळवार ते गुरुवारपर्यंत या दहा दिवसांत घरगुती व सार्वजनिक मंडळाचे मिळून 15 हजारांहून जास्त गणेश मूर्तींचे या हौदांमध्ये विसर्जन करण्यात आले.

संयोजक विजय आसवानी यांनी सांगितले की, मूर्तीबरोबर असणारे निर्माल्य व सजावटीचे साहित्य वेगळे ठेवण्यासाठी स्वयंसेवक व पिंपरी-चिंचवड रोट्रॅक्ट क्लबचे ज्येष्ठ नागरिक भाविकांचे प्रबोधन करीत होते. विसर्जनाच्या वेळी श्रींच्या आरतीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. वाहतूक शाखेच्या वतीने पोलीस, महापालिकेच्या वतीने पाणी व निर्माल्यकुंड उपलब्ध करून देण्यात आले. जमा झालेले निर्माल्य महापालिकेने मोशी येथे उभारलेल्या गांडूळ खत प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे.

संयोजकांच्या वतीने विद्युत व्यवस्था व स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच खासगी अनुभवी जीवरक्षक नेमण्यात आले होते. मागील वर्षी जमा झालेल्या मूर्तींचे विघटन करण्यात आले. त्यातून जमा झालेल्या मातीतून बनविलेल्या आकर्षक कुंड्या या ठिकाणी सहभागी झालेल्या कुटुंबांना व मंडळांना संयोजकांच्या वतीने देण्यात आल्या, अशीही माहिती संयोजक विजय आसवानी यांनी दिली.

सण, उत्सव साजरे करीत असताना पर्यावरणाचे रक्षण व्हावे व गणेशोत्सव काळात नदी नाल्यांचे प्रदूषण होऊ नये. या उद्देशाने पिंपरीगावात हौद उभारण्यात आले होते. संयोजकांच्या आवाहनाला यावर्षी उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like