India vs Sri Lanka 3rd T20I : श्रीलंका संघाने पन्नाशीत गमावले पण विशीत कमावले

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : एकदिवशीय मालिकेत मार खाल्ल्यानंतर सावरत आपला खेळ उंचावलेल्या नवख्या श्रीलंकन संघाने मजबूत भारतीय संघाला लागोपाठ दोन 20/20 सामन्यात जबरदस्त खेळ करत पराभूत करून  भारतीय संघाला 20/20 हारवत पहिल्यांदाच मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. याचसोबत श्रीलंका संघाने 2019 नंतर एखादी मालिका जिंकली आहे.

तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात श्रीलंका संघाने सर्व आघाडीवर उत्तम खेळ करत भारतीय संघाला चारीमुंडया चित करत पराभूत केले. मालिकेत चांगली सुरुवात केल्यानंतर भारतीय संघाचा खेळ मात्र अविश्वसनिय रित्या खालावत गेला, ज्याची चुटपुट अनेक भारतीय क्रिकेटरसिकांना खूप दिवस लागून राहील.

प्रेमदासा मैदानावर झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात शिखर धवनने नाणेफेक जिंकू फलंदाजी स्वीकारली खरी पण त्याचा तो निर्णय साफ चुकीचा होता. हे नंतरच्या काहीच मिनिटात सप्रमाण सिद्ध झाले. मालिका बरोबरीत असताना महत्वाच्या सामन्यात कर्णधार म्हणून त्याने  काहीही चमक दाखवली नाही, आणि तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. या धक्क्यातून भारतीय संघ सावरलाच नाही. एकापाठोपाठ एक रथी महारथी तू चल मै आया च्या धर्तीवर तंबूत परतत होते.

एक बाद पाच ते पाच बाद 35 अशी सुरुवात झाल्यानंतर पुढे काय होणार याचा अंदाज येत होताच. दुःखात सुख इतकेच की इतकी बदतर अवस्था झाल्यानंतर सुद्धा भारतीय संघ सम्पूर्ण 20 षटके खेळला आणि सर्व गडी बाद ही झाले नाहीत. कुलदीप यादवच्या नाबाद 23 धावा तर ऋतुराज गायकवाडच्या 14 आणि भुवनेश्वरच्या 16 धावा सोडल्या तर बाकी एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. आयपीएलचा बादशहा म्हणवला जाणारा संजू सॅमसन आजही काही खास करू शकला नाही. अनेक महान खेळाडू सर्व काही असूनही केवळ संधी न मिळाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकले नाही, मात्र संजू सॅमसनला अनेकदा संधी मिळूनही आपले नाणे मोठया स्तरावर सिद्ध करता आलेले नाही, हे दुःखद अंतकरणाने म्हणावे, लिहावे लागते.

आठ बाद 81 अशा बिकट अवस्थेत भारतीय संघ धारातीर्थी पडला. श्रीलंका संघातर्फे  हसरंगाने भारताविरुद्ध सर्वोत्तम 20/20 तील जन्मदिवसाच्या दिवशी कामगिरी केली. त्याने केवळ 9 धावा देत चार गडी बाद केले. त्याला कर्णधार शनाकाने दोन गडी बाद करत उत्तम साथ दिली.

120 चेंडूत 82 धावा अशी सुलभ वेळ 20/20 त फार दुर्मिळ असते ती लंकेला मालिका निर्णायक वळणावर असताना मिळाली, जिचा त्यांनी अचूक फायदा उठवत हे लक्ष पंधराव्या षटकातच गाठत बलाढय भारतीय संघाला 7 गडी राखून पराभूत केले. राहुल चहरने तीन गडी बाद  करत थोडीफार रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला खरा पण लक्ष मामुली असल्याने श्रीलंका संघाला फारशी अडचण आलीच नाही.

धनंजय डिसिल्वा आणि हसरंगाने उर्वरित कार्य शांत डोक्याने पार पाडले आणि पहिला सामना हारल्यानंतर सुद्धा लागोपाठ दोन सामने जिंकून मालिकेत विजय प्राप्त केला. आणि संक्रमण काळातून जात असलेल्या श्रीलंका क्रिकेटसंघाला एक नवसंजीवनी मिळवून दिली असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

बीसीसीआयच्या सौजन्याने ही मालिका झालीय हे जगजाहीर आहे, श्रीलंकन खेळाडूंनाही त्याची जाण आहेच म्हणूनच शनाकाने करंडक उंचावन्याआधी बीसीसीआयचे जाहीर आभार मानले. श्रीलंका संघाला यातून नवसंजीवनी मिळाली असली तरी अनेक नवोदित भारतीय खेळाडू ना मिळालेल्या या सोन्यासारख्या संधीचे चीज करता आले नाही हे तितकेच कटू सत्य आहे, मुख्य खेळाडू उपलब्ध झाल्यानंतर अशी संधी पुन्हा कधी मिळावी याचा विचार करत ती मिळालीच तर तिचे सोने करता कसे यावे हा यक्षप्रश्न आपल्यासारख्या क्रिकेट रसिकांना या नवोदित खेळाडूंइतकाच सतावत राहील,नाही का?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.