Pune News : एकविरा देवीसमोर अंधश्रद्धेपोटी पशुबळी देऊ नये – डॉ. कल्याण गंगवाल

राज्य सरकारने पशुबळी विरोधात कायदा करण्याची डॉ. कल्याण गंगवाल यांची मागणी

एमपीसी न्यूज – “देवदेवतांच्या जत्रांमध्ये पशुबळी देण्याची अनिष्ट प्रथा वर्षानुवर्षे आहे. हे सगळे प्रकार केवळ अंधश्रद्धेपोटी केले जात आहेत. कोणत्याही देवाला पशूचा बळी देऊन नैवैद्य दाखविणे अपवित्र आहे. त्यामुळे भाविक भक्तांनी एकविरा देवीसमोर पशुबळी देऊ नये तसेच राज्य सरकारने पशुबळी विरोधात कायदा करून पशुबळीवर बंदी आणावी,” अशी आग्रही मागणी सर्व जीव मंगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी एकविरा देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत केली.

महाराष्ट्रातील जागृत देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कार्ला (लोणावळा) येथील कुलस्वामिनी एकविरा देवीची यात्रा गुरुवार (दि. 7) ते शनिवार (दि. 9) या कालावधीत होत आहे. देवीचा नवस फेडण्यासाठी अनेक भाविक बकरे, कोंबड्या आधींचा बळी देतात. पशुबळी देऊन तेथेच अन्न शिजवायचे आणि प्रसाद म्हणून त्याचे भक्षण करायचे. त्याचबरोबर मांसाहार याबरोबरच मद्यप्राशन करायचे असा अघोरी प्रकार अनेकदा पाहायला मिळतो. एकविरा देवीसह तुळजापूरच्या भवानी मातेला, जेजुरीच्या खंडोबाला अशा प्रकारे पशुबळी देण्याची ही प्रथा अत्यंत चुकीची असून, भाविकांनी अशा रीतीने पशुबळी देऊ नयेत, असे डॉ. गंगवाल यांनी नमूद केले.

या प्रथेविरोधात जनजागृती करण्यासाठी सर्व जीव मंगल प्रतिष्ठानच्या वतीने गेली अनेक वर्षे प्रयत्न करण्यात येत आहे. काही देवस्थानांमध्ये सकारात्मक बदल झाले आहेत. यंदा यात्रेवेळी अनेक कार्यकर्ते तेथे जाऊन पत्रके वाटतील, तसेच प्रबोधनपर फलक लावण्यात येतील आणि भाविकांशी संवाद साधून मतपरिवर्तन करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे डॉ. गंगवाल यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मंत्री, एकविरा देवी मंदिर ट्रस्टचे प्रमुख, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना यासंदर्भात निवेदने देऊन हा प्रकार थांबवण्याची विनंती केली आहे तसेच मंदिर प्रशासनाकडून कडक धोरण अवलंबण्याची मागणी असून, यावेळी पशुक्रुरता प्रतिबंध कायदा व मुंबई पोलिस कायदा अंतर्गत उघड्यावर, मंदिर परिसरात पशुपक्ष्यांच्या बळी देणाऱ्यांविरोधात गुन्हे नोंदविणार असल्याचेही डॉ. गंगवाल यांनी नमूद केले.

‘या’ राज्यांत आहे पशुबळी विरोधी कायदा

गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्यांत कायद्याने पशुबळी गुन्हा आहे. या राज्यात पशुबळी विरोधात कायदा करण्यात आलेला असून, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणातील उच्च न्यायालयाने पशुबळी चुकीचे असून, त्यावर त्वरित बंदी घालावी, असे निर्णय दिले असल्याचेही डॉ. गंगवाल यांनी निदर्शनास आणून दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.