Bhosari : शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेला राज्य सरकारचा ‘सहकार भूषण’ पुरस्कार जाहीर

51 हजार रुपये देऊन करणार गौरव

एमपीसी न्यूज – सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या सहकारी संस्थांना राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा ‘सहकार भूषण’ पुरस्कार भोसरीतील शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेला जाहीर झाला आहे. पुरस्काराची रक्कम 51 हजार रुपये असणार आहे. या पुरस्काराने संस्थेच्या नावलौकिकात आणखीन भर पडली आहे. 

राज्यातील सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करीत असलेल्या सहकारी संस्थांना सहकार महर्षी, सहकार भूषण आणि सहकार निष्ठ असे पुरस्कार आणि रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक, स्मृती चिन्ह प्रदान करुन त्यांचा गौरव राज्य सरकारतर्फे केला जातो. सन 2016-17 या वर्षातील कामगिरीसाठी राज्यातील सहकारी संस्थांना पुरस्कार देण्याकरिता उत्कृष्ठ संस्थांची निवड करण्यासाठी सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. समितीने पुरस्कारप्राप्ती संस्थांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये भोसरीतील शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेला ‘सहकार भूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेचा उत्कृष्ठ पतसंस्था असा लौकिक आहे. पतसंस्थेकडे सुमारे 14.25 कोटींच्या ठेवी आहेत. पतसंस्थेच्या स्थापनेला 24 वर्ष झाली असून सुरुवातीपासून पतसंस्थेला ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. पतसंस्थेला अविज पब्लिकेशन, कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा, पुणे यांच्यावतीने देण्यात येणारा ‘बँको पुरस्कार’ सलग दोनवेळा मिळाला आहे. पतसंस्थेकडून सभासदांना आरोग्यासाठी 10 हजार रुपयांची मदत केली जाते. तसेच एखाद्या सभासदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना मदत म्हणून पाच हजार रुपयांची मदत देण्यात येते. तसेच विविध लोकोउपयोगी उपक्रम राबविले जातात.

पतसंस्थेचे अध्यक्ष कैलास आवटे म्हणाले, ‘पत संस्था स्थापनेपासून सभासदांच्या हिताचे कार्य करित राहिली. सभासदारांच्या विश्वासाला कधीच तडा दिला जाऊ दिला नाही. संस्थेच्या कार्याची दखल घेत अनेक पुरस्कार संस्थेला मिळाले आहेत. आता राज्य सरकारचा ‘सहकार भूषण’ पुरस्कार मिळाल्याने आंनद झाला आहे. या पुरस्काराने आणखीन चांगले काम करण्यास उर्जा, बळ मिळणार आहे’.

उपाध्यक्ष बाळासाहेब गुंजाळ, संचालक मुकुंद आवटे, सुहास गटकळ, निंबा डोळस, निलेश मुटके, अरुण डेहणकर, शांताराम कुंभार, अॅड. सुर्यकांत काळे, प्रवीण गटकळ, शांतीश्वर पाटील, ज्योती हांडे, संगीता इंगळे, बाळू भोर या संचालक मंडळाचे संस्थेच्या वाटचालीत मोठे योगदान आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.