Pimpri : ठेकेदारांच्या हातात राज्य – खासदार राऊत

काँग्रेसपेक्षा भाजपच्या राजवटीत अधिक भ्रष्टाचार

एमपीसी न्यूज – काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेत भ्रष्टाचार होत होता. त्याच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार भाजपच्या राजवटीत सुरु आहे. ठेकेदारांच्या पैशांवर निवडणुका लढवून जिंकल्या जात आहेत. आमदार, नगरसेवकांची खरेदी केली जात आहे. जनतेच्या पैशांवर डल्ला मारला जात आहे. हा पापाचा पैसा आहे. सध्या ठेकेदारांच्याच हातात राज्य आहे, असा आरोप शिवसेना नेते आणि पुणे विभागीय संपर्कनेते खासदार संजय राऊत यांनी  केला. तसेच मावळ आणि शिरुर दोन्ही मतदार संघातून शिवसेनेचे खासदार येणार असून तीनही विधानसभेवर भगवा फडकाविण्याचा आमचा निश्चय आहे, असेही ते म्हणाले.

पिंपरीत पत्रकारांशी बोलताना खासदार राऊत म्हणाले, पेट्रोल, डिझेलचे दर दिवसें-दिवस वाढतच आहेत. पेट्रोल 100 पार करण्याच्या मार्गावर आहे. रुपयाचे अवमूल्यन होत आहे. अर्थव्यस्था संपूर्णपणे ढासळली आहे. त्यावर कोणीच काही बोलत नाही. विरोधात असताना पेट्रोल वाढल्यावर भाजप काय भूमिका घेत होती. आज का शांत आहेत.

 

आगामी निवडणूक स्वबळावर लढविण्याचा शिवसेनेने नारा दिला आहे. त्याबाबतचा ठराव पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये झाला आहे. त्यानुसार आम्ही आगामी निवडणुकीची तयारी सुरु केली. मावळ आणि शिरुरमधून आमचे खासदार निवडून येणारच आहेत. 2014 च्या वाळवटीत यश मिळू शकले नाही. परंतु, ते चित्र 2019 मध्ये नसेल असे मी खात्रीपूर्वक सांगतो. विधानसभा निवडणूक मुदतपूर्व होणार नाही. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र देखील होणार नसल्याचे सांगत राऊत म्हणाले, जर दोन्ही निवडणुका सोबत आणि विधानसभा मुदतपूर्व झाली तरी त्याला शिवसेनेची तयारी आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुखी खूर्चीतून साम-दाम-दंड-भेदाची भाषा आली. ती भाषा फक्त भाजपच वापरु शकत नाही. शिवसेना देखील साम-दाम-दंड-भेदाची भाषा वापरु शकतो. आम्ही ती भाषा जनतेच्या हितासाठी वापरत आहोत, असेही राऊत म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.