Nigdi:’…शिवा मला घरी ने’; 80 वर्षांच्या आजीची भर पावसात आर्त हाक आणि मदतीला धावलेली तरुणाई

पण यमुनानगर मधल्या तरुणांनी केलेली धडपड ही रसातळाला गेलेल्या माणुसकीतील एक आशेचा किरण असल्याचे दाखवून देते.

एमपीसी न्यूज – ‘…शिवा मला घरी ने’ भर पावसात कण्हत, विव्हळत आणि जिवाच्या आकांताने मारलेली ही हाक रक्ताचे नाते असलेल्या शिवाने ऐकली नाही. शिवा कोण, कुठला याबाबत कुणाला काहीही माहिती नाही. पण माणुसकीच्या नात्याने ही हाक यमुनानगर येथील दोन तरुणांनी ऐकली आणि विव्हाळणा-या आजींना एका वृद्धाश्रमाच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केलेल्या आजींची अवस्था पाहून हरवलेली रक्ताची नाती, रसातळाला गेलेली माणुसकी यांचे तत्काळ दर्शन होते. पण यमुनानगर मधल्या तरुणांनी केलेली धडपड ही रसातळाला गेलेल्या माणुसकीतील एक आशेचा किरण असल्याचे दाखवून देते.

मागील सुमारे तीन आठवड्यांपासून यमुनानगर परिसरात एक 80 वर्षांच्या आजी फिरत होत्या. त्यांच्या फिरण्यावर संचारबंदी, टाळेबंदी असे कोणतेही नियम कोरोनाच्या काळात लागले नाहीत.

कारण याकडे पोलिसांचे कधी लक्षच गेले नाही. नागरिकांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले. सोमवारी दुपारी या आजी यमुनानगर मधल्या निघोजकर यांच्या दारात आल्या.

निघोजकर कुटुंबातील सहृदय सदस्यांनी आजींना जेवण दिले. जेवण करता करता आजी बरळल्यासारखं बोलू लागल्या. त्यामुळे निघोजकर कुटुंबातील सदस्य योगेश्वर निघोजकर यांना त्यांचा संशय आला. त्याने आजींकडे त्यांच्याबाबत चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न वाया गेला. त्यांच्यासोबत बोलल्यावर आजी जास्तच चिडचिड करून ओरडू लागल्या.

अनेक दिवसांपासून रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला असू शकतो, अशी शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिक त्यांच्या जवळ जाण्यास घाबरू लागले.

दरम्यान, नागरिकांनी पोलिसांना याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांची इच्छा नसल्याने आजींच्या बाबतीत कोणी काहीच करू शकले नाही.

सोमवारी (दि. 3) रात्री जोरदार पाऊस आला. त्यावेळी आजी यमुनानगर मधील एका रस्त्याच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर निवांत बसल्या होत्या. बघणा-यांच्या डोळ्याला त्यांचे निवांत बसणे दिसत असेल. पण पावसात भिजल्याने चालू शकत नसल्याने त्या एका जागी ठप्प झाल्या होत्या.

आतून त्या मदतीसाठी आकांताने ओरडत होत्या. त्यांची ती आर्त हाक कुणालाही ऐकायला येत नव्हती. कारण, रस्त्याच्या बाजूला वाढलेले गावात, वरुन पडणारा पाऊस, त्यात आजी जखमी, वयोवृद्ध आणि अनेक दिवसांपासून बाहेर फिरत असल्याने कोरोनाचा संशय…

यामुळे सहजासहजी कोणीही त्यांच्या जवळ जाण्यास घाबरणे हे साहजिकच. पण ही आर्त हाक ऐकली अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकणा-या योगेश्वर निघोजकर आणि चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या मिहिर देशपांडे यांनी.

योगेश्वर निघोजकर म्हणतात, “आजी रात्रीपासून फुटपाथवर बसल्या होत्या. याबाबत पोलिसांना कळवलं होतं. त्यानंतर पोलिसांचे एक बीट मार्शल आले आणि आजींना नुसतं पाहून गेले. पोलीस गेले तरी बराच वेळ आजी तिथेच बसून होत्या. त्यावर काहीही झाले नाही.

पोलिसांना सांगितल्यानंतर पोलीस नागरिकांवरच प्रश्नांची सरबत्ती करतात. त्यामुळे हे पोलिसांना सांगून आपण चूक केली का, असं वाटू लागतं. रात्री आम्हाला कशाला त्रास देता. दिवसा सांगता येत नाही का? असा पोलिसांचा सवाल असुरक्षिततेची भावना निर्माण करतो, असे निघोजकर दुःखी होऊन सांगतात.

स्थानिक नगरसेवकांना याबाबत सांगितले. पण त्यांनीही याकडे दुर्लक्षच केले. शेवटी एका वृद्धाश्रमाला संपर्क करून रात्री अडीच वाजता आजींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचेही निघोजकर म्हणाले.

चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या मिहिर देशपांडे यांनी याबाबत एक ट्विट केले. त्यात त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, पुणे पोलीस, पिंपरी-चिंचवड पोलीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रातील नेत्यांना देखील टॅग केले.

टॅग केलेल्या एकाही व्यक्तीचा त्यावर रिप्लाय आला नाही. कारण, कदाचित त्यांच्यासाठी एखाद्या वृद्ध महिलेच्या जीवन मरणाचा प्रश्न एवढा महत्वाचा नसावा. अभिनेत्यांच्या आणि राजकीय लोकांच्या पोस्टला काही सेकंदात रिप्लाय करणारी यंत्रणा आजींच्या प्रकरणात लॉग आऊट होऊन बसली होती.

मिहिर देशपांडे म्हणाले, “मी ट्विटरवर याबाबत पोस्ट केली. पण यावर कोणी काहीच रिप्लाय दिला नाही. शेवटी आम्हीच आमच्या परीने किनारा वृद्धाश्रामाशी संपर्क केला. त्यांना हकीकत सांगितली.

त्यानंतर किनारा वृद्धाश्रमाच्या प्रीती वैद्य तत्काळ आल्या आणि त्यांनी पुढाकार घेऊन आजींना रुग्णालयात दाखल केले. आपला प्रश्न सुटला असल्याने सोमवारी रात्री मीच त्यावर रिट्विट केले आणि आजींना रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. मंगळवारी सकाळी ते ट्विट मी डिलीट केले.”

किनारा वृद्धाश्रमाच्या प्रीती वैद्य म्हणाल्या, “सोमवारी रात्री दहा वाजता हा प्रकार मला समजला. मी प्राथमिक माहिती देऊन लगेच यमुनानगरला पोहोचले. सुमारे 80 वय असलेल्या आजी पावसात भिजल्या होत्या.

खूप गारठल्या होत्या. त्या जखमी अवस्थेत बसलेल्या होत्या. त्यांना लूज मोशनचा त्रास होत होता. त्यामुळे पोलिसांना बोलावून घेतले. त्यानंतर 108 क्रमांकावर संपर्क करून रुग्णवाहिका बोलावली आणि आजींना पिंपरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

आजींची प्रकृती आता व्यवस्थित आहे. त्यांची कोरोनाची चाचणी करायची आहे. वेळीच मदत मिळाली नसती, तर त्यांच्या जीवाचे बरे वाईट झाले असते. आजींची मानसिक अवस्था बरी नसल्याची शक्यता आहे. त्या सारखं ‘शिवा मला घरी ने. शिवा मला हात दे. मला पलीकडे सोड’ असं म्हणत आहेत.

त्यामुळे आजींना विश्वासात घेऊन हा शिवा कोण, त्याचं नाव, गाव विचारून नातेवाईकांचा शोध घेणं गरजेचे आहे. नातेवाईकांचा शोध घेऊन आजींना त्यांच्या ताब्यात देण्यात येईल. जर नातेवाईक नाहीत मिळाले तर आजींना किनारा वृद्धाश्रमात दाखल करून घेतले जाणार असल्याचेही प्रीती वैद्य यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.