Talegaon Dabhade News : तब्बल 47 वर्षानंतर स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्याचे निधन; वर्गमित्रांनी मित्राच्या आठवणीत राबवला स्तुत्य उपक्रम

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade News ) येथील ॲड. पु. वा. परांजपे शाळेच्या सन 1974 -75 सालच्या अकरावीच्या बॅचचे विद्यार्थी स्नेहसंमेलनासाठी एकत्र जमले. तब्बल 47 वर्षानंतर विद्यार्थी एकत्र आले होते. त्यांच्या वयाच्या साठीनंतरही नवचैतन्य भरले होते.

स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रम समारोपप्रसंगी संपूर्ण आनंद घेतल्यानंतर मुकुंद बाळकृष्ण करंदीकर या विद्यार्थ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. खूप वर्षानंतर भेट झाली आणि मित्राची अकाली एक्झिट झाल्याने संपूर्ण बॅचने हळहळ व्यक्त केली.

तसेच मुकुंद करंदीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सर्वांनी एक लाख रुपयांची वर्गणी जमा करून ती शाळेला दिली. त्या रकमेतून येणारे व्याज दरवर्षी दहावीच्या वर्गात पहिला आणि दुसरा क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. करंदीकर यांच्या निधनामुळे दुःख व्यक्त होत असले तरी त्यांच्या नावाने मित्रांनी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुकही होत आहे.

सन 1974 -75 मध्ये एसएससीला असलेल्या विद्यार्थ्यांचा 47 वर्षानंतर स्नेहमेळावा नुकताच येथील राम मनोहर लोहिया सभागृहामध्ये उत्साहाने पार पडला. या मेळाव्याच्या समारोपानंतर मुकुंद बाळकृष्ण करंदीकर या विद्यार्थ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु त्यांची प्राणज्योत मालवली होती. याचे दुःख सर्वांना होते.

त्या दुःखाची उतराई करण्यासाठी स्वर्गीय मुकुंद बाळकृष्ण करंदीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सन 1974 -75 एसएससी बॅच कडून एक लाखाची देणगी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या ॲड. पु.वा परांजपे शाळेस देण्यात आली.ही देणगी अजीवन अनामत रक्कम म्हणून शालेय पतपेढीमध्ये ठेवण्यात आली असून तिच्यापासून प्रत्येक वर्षी येणारे व्याज त्यामधून इयत्ता दहावी मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीच्या (Talegaon Dabhade News ) रुपाने बक्षीस देण्यात येणार आहे.

ही देणगी ॲड.पु.वा.परांजपे शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार शेलार, मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी स्वीकारली. यावेळी माजी नगराध्यक्ष ॲड. रवींद्र दाभाडे, समन्वयक मनोहर दाभाडे, कुंडलिक भेगडे,  सोमकांत टकले, सुरेश खांडवे, मधुसूदन खळदे, पांडुरंग करंडे, सखाराम जगताप,सुलभा परळीकर सह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

यावेळी ॲड रविंद्र दाभाडे म्हणाले स्पर्धेतून आमचे व्यक्तीमत्व घडते. शाळेत आर्थिक मदत दिल्याने निश्चितच याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो. नंदकुमार शेलार म्हणाले,” शाळा या उपक्रमाचे ऋणी राहील. ही देणगी शाळेचे  शिष्यवृत्तीसाठी उपयोगी ठरेल. यावेळी स्वर्गीय करंदीकर यांच्या पत्नी मधुरा करंदीकर म्हणाल्या 47 वा स्नेहसंमेलनाचा दिवस विसरू शकत नाही.त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाचा क्षण चिरकाल स्मरणात राहील.

प्रास्ताविक मनोहर दाभाडे यांनी केले तर आभार सोमकांत टकले यांनी केले. या स्तुत्य उपक्रमाचे शालेय समितीकडून कौतुक करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.