Bhosari: ‘भोसरीतील नगरसेवकांचा विषय आला की ‘पॉलिसी’ कशी येते’? 

नगरसेवक विकास डोळस यांनी आयुक्तांना घेतले फैलावर 

एमपीसी न्यूज – भोसरी मतदार संघातील नगरसेवकांचा विकासकामाचा विषय आला की पॉलिसी, धोरण आणले जाणार असल्याचे सांगितले जाते. वारंवार असे प्रकार घडत आहेत. जाणीवपुर्वक भोसरीतील नगरसेवकांना त्रास दिला जात आहे.  भोसरीतील विकासकामांनाच धोरण ठरवावे लागत आहे, असे का ? असा खडा सवाल स्थायी समितीचे सदस्य विकास डोळस यांनी उपस्थित केला. त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर निरुत्तर झाले. भोसरीतील नगरसवेकांची कामे अडविल्यास शांत बसणार असा इशाराही डोळस यांनी दिला. 

स्थायी समितीच्या सभेत इंद्रायणीनगर येथील बॅडमिंटन हॉल एका संस्थेला करारानुसार चालवायला देण्याचा नम्रता लोंढे यांनी मांडलेल्या प्रस्तावाला दोन महिन्यांपूर्वी मान्यता दिली आहे. मात्र, अद्यापही या प्रस्तावाची अंमलबजावणी झालेली नाही. मंगळवारी झालेल्या स्थायीच्या बैठकीत लोंढे यांनी या प्रस्तावाची अंमलबजावणी का झाली नाही? याची आयुक्त हर्डीकर यांना विचारणा केली. मात्र, आयुक्तांनी त्यांच्या प्रश्‍नाला थातुर-मातुर उत्तरे दिली. तसेच याकरिता धोरण ठरविणे गरजेचे असल्याचे सांगितले.

यावर स्थायी सदस्य विकास डोळस चांगलेच भडकले. त्यांनी आक्रमक भुमिका घेत आयुक्तांना फैलावर घेतले. भोसरी मतदार संघातील नगरसेवकांची कामे आले की धोरण, पॉलिसी कशी अडवी येते. वारंवार असे का होत आहे. जाणीवपुर्वक तुम्ही करत आहत का?  भोसरीतील नगरसेवकांनी सुचविलेल्या विकासकामांबाबत धोरण ठरविण्याची उत्तरे देता. अन्य भागात हा निकष का लावत नाही? यापुर्वीदेखील प्रशासनप्रमुख या नात्याने अशीच बेजबाबदार उत्तरे तुम्ही भोसरीतील लोकप्रतिनिधींना दिली आहेत.

प्रशासनाचा हा दुजाभाव यापुढे खपवून घेतला जाणार नाही. क्रीडा विभागाअंतर्गत असलेली क्रीडांगणे, व्यायामशाळा अशा सर्वच आस्थापनांचे करार रद्द करुन, धोरण ठरविल्यनंतरच त्यांचे वाटप करावे, अशी मागणीही डोळस यांनी केली. डोळस यांच्या प्रश्वांवर आयुक्त श्रावण हर्डीकर निरुत्तर झाले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये दोन्ही आमदारांच्या समर्थकांची वर्णी लावण्यात आली आहे. त्यामुळे विकासकामांचे विषय मंजुर करताना अनेकदा वादळी चर्चा झाली आहे. मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मात्र लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन असा सामना पहायला मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.