Mumbai : यूपीएससी परीक्षेतील यशस्वी उमेदवारांचा मंगळवारी विधानमंडळातर्फे गौरव

Felicitation of successful UPSC exam candidates.

एमपीसी न्यूज – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा- 2019 (यूपीएससी) मध्ये महाराष्ट्रातून यशस्वी झालेल्या उमेदवारांचा महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीने गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा गौरव सोहळा मंगळवार (दि. 25) रोजी सायंकाळी 4 वाजता विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात होणार आहे.

कार्यक्रमासाठी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतिश गवई आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

बुद्धिमत्ता, ध्येय, एकाग्रता, अभ्यासू वृत्ती आणि कठोर परिश्रमाच्या बळावर प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत उज्ज्वल यश मिळवणाऱ्या या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्र विधानमंडळातर्फे प्रथमच करण्यात येत आहे.

यावर्षी जवळपास 80 उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेत सुयश प्राप्त करुन महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

विधानमंडळाकडून या यशस्वी उमेदवारांचा गौरव म्हणजे स्वजनाकडून त्यांच्या कर्तृत्वाला दिलेली कौतुकाची दाद असून त्यांच्या भावी उज्ज्वल कारकिर्दीकरिता शुभेच्छा आहेत.

या कार्यक्रमासाठी यशस्वी उमेदवार व त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रित करण्यात आले आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विषयक सूचनांचे पालन करण्यात येईल, अशी माहिती विधानमंडळाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.