Pimpri : पिंपरीत रंगणार राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे घमासान ; महिला व पुरूषांच्या प्रत्येकी सोळा संघाचा सहभाग

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने बुधवार (दि.१८) पासून पिंपरी येथे २१ व्या छत्रपती शिवाजी महाराज पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय व
कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त यजमान पदाखाली या पुरुष व महिला वरिष्ठ गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी आज (रविवारी) आकुर्डी येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पिंपरीचे विद्यमान आमदार आण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी उपमहापौर योगेश बहल व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे १२ पुरुष व १२ महिला तर विदर्भ कबड्डी असोसिएशनचे ४ पुरुष व ४ महिला असे १६ पुरुष आणि १६ महिला संघाना या स्पर्धेत सहभाग देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने चिपळूण-रत्नागिरी येथे झालेल्या ६७ व्या वरिष्ठ गट पुरूष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ज्या पुरुष व महिला संघांनी बाद फेरी गाठली अशा १२-१२ संघाना या स्पर्धत सहभागी करून घेण्यात आले आहे. विदर्भ कबड्डी असोसिएशनचे ४-४ संघाना देखील हाच निकष लावण्यात आला असल्याची माहिती यावेळी दिली.

राज्य शासनाने गठीत केलेली समिती या स्पर्धेचे नियोजन पाहणार आहे. विजेत्या संघाला वीस हजार रुपयांचे पहिले पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे. तसेच पंच व सहभागी संघांना प्रवास खर्च सुद्धा देण्यात येणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा१८ ते २२ मार्च या कालावधीत नव महाराष्ट्र विद्यालय, पिंपरी वाघेरे येथे पार पडणार असून अंतिम सामना दि.२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.