Pune: पुणे जिल्ह्यातील यंत्रणा कोरोना नियंत्रणासाठी एकाच सेंट्रल कमांडखाली काम करणार

The system in Pune district will work under a single central command for corona control उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात रात्री उशिरा बैठकीचे आयोजन; बैठकीत केंद्रीय मंत्र्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज – पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढच्या काळात संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशानुसार काम करेल. कन्टेन्मेंट भागात घरोघरी जावून मर्यादित कालावधीत तपासणी पूर्ण केली जाईल. रुग्णांचा शोध घेऊन त्यांचं सुरक्षित अलगीकरण, विलगीकरण केलं जाईल. कोरोना प्रसार रोखण्यासाठी जनजागृती करुन लोकसहभाग वाढवण्यात येईल. विभागीय आयुक्तांसह जिल्ह्याधिकारी, महापालिका आयुक्तांसह प्रमुख अधिकारी नियमित पत्रकार परिषद घेऊन नागरिकांशी संवाद साधतील. नागरिकांना, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन कोरोनाविरुद्धची लढाई एकजुटीनं लढली जाईल आणि आम्ही पुणेकर कोरोनाविरुद्धची ही लढाई नक्की जिंकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित विशेष बैठकीत व्यक्त केला.

पुणे शहर, जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती, उपाययोजनांसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात मंगळवारी (दि.28) सायंकाळी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, राज्याचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव, पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जमाबंदी आयुक्त तथा ‘ससून हॉस्पिटल’चे समन्वयक एस. चोक्कलिंगम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी हे देखील प्रत्यक्ष किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी म्हणाले की, पुण्यात ‘कोरोना’च्या चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्यामुळेच रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. पुण्यातील स्थिती नियंत्रणात आहे.

पुण्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्याचा मुद्दा राज्य शासनाने गांभीर्याने घेतला असून जिल्ह्यातील सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागल्या आहेत. खुद्द मुख्यमंत्री दोन दिवसांत पुण्याला भेट देणार असून त्यांच्या भेटीमुळे या लढाईला निश्चित बळ मिळेल. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या स्थिती आणि उपाययोजनांसंदर्भात माहिती सादर केली.

पुणे जिल्ह्यात तीन जम्बो कोविड रुग्णालये उभारण्यात येत आहेत. ससून रुग्णालयासह सर्वच रुग्णालयातील बेडची संख्या वाढवण्यात येत आहे. व्हेंटिलेटर्स, आयसीयू आणि ऑक्सिजन बेडची संख्या वाढवण्यावर भर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

गरजू रुग्णांना हे बेड उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थापन यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांचंही सहकार्य मिळत आहे. खासगी रुग्णालयांना त्यांच्या गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टर, भूलतज्ज्ञ, फिजिशियन, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई सेवा देणारे कर्मचारी आदी उपलब्ध होतील, याचेही प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

केंद्राकडून राज्य सरकारला सहकार्य मिळत असल्याचे स्पष्ट करतानाच राज्य सरकाने केंद्राकडे मागणी केल्याप्रमाणे व्हेंटिलेटर्स, प्लाझ्मा थेरेपी संदर्भातील आवश्यक परवानग्या त्वरीत मिळाव्यात, जीवरक्षक औषधे उपलब्ध व्हावीत, पुण्यातील रुग्णालयातील डॉक्टरांवर येणारा ताण लक्षात घेता संरक्षण दलाच्या रुग्णालयातील डॉक्टरांचे सहाय्य मिळावे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लक्ष घालण्याची विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.

पुण्यातील कन्टोन्मेंट परिसराचा विचार करता आणि पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकांवरील खर्चाचा बोजा लक्षात घेता केंद्र सरकारने याबाबत विचार करण्याची गरज महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, पुण्यात सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन होईल यावर भर देण्यात यावा. ‘कोरोना’ बाधितांची संख्या लक्षात घेऊन शहरासह लगतच्या उपनगरांमध्ये कन्टेंन्मेंट झोनची वारंवार पुनर्रचना करण्यात यावी. कन्टेंन्मेंट झोनमध्ये नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा करण्यात यावा.

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत सिरो सर्व्हे करण्यात यावेत. यासाठी स्वयंसेवी संस्थाची मदत घेण्यात यावी. कॅन्टोन्मेंट परिसरातील एएफएमसी आणि कमान्ड हॉस्पिटलची यंत्रणा, तज्ज्ञ, मनुष्यबळाचा पुरवठा पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी संरक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेल्या बहुतांश सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मान्य केल्या.

केंद्राचे अधिकारी डॉ. सुजित कुमार यांनीही पुण्यातील कोरोनासंदर्भातील कार्यवाही योग्य दिशेने सुरु असल्याचे सांगत कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याबाबत समाधान व्यक्त केले. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वांनी मिशनमोडवर काम करण्याचे आवाहन करुन टेस्टिंग, सर्चिंग करण्यावर भर देण्याची सूचना त्यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.