Pune : व्यवस्थेने कुठल्याही प्रकारची समस्या बनू नये – संजय महाराज पाचपोर

एमपीसी न्यूज – व्यवस्थेने कुठल्याही प्रकारची समस्या बनू नये, संस्थेचे संचालक मंडळ ही व्यवस्था असते आणि योगीराजची व्यवस्था सदृढ आहे, असे मत विदर्भ रत्न ह. भ. प. संजय महाराज पचपोर यांनी केले.

योगीराज पतसंस्थेच्या कैलेंडर प्रकाशन व योगीराज कन्यारत्न विवाह मदत प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका संगिता ताम्हाणे, योगीता नागरगोजे, साधना मळेकर, माजी नगरसेवक मारुती भापकर तसेच संस्थेचे संचालक, कर्मचारी, परिसरातील मान्यवर नागरिक, सभासद व खातेदार उपस्थित होते. आलेल्या सर्वांचे स्वागत संस्थेचे संचालक तथा नियोजन समिती अध्यक्ष राजेश विधाते यांनी केले.

सत्य टिकण्यासाठी समर्पणाची गरज भासते, तसेच योगीराजचे सर्व संचालक मंडळ निस्वार्थपणे समर्पण देत आहेत. त्यामुळेच संस्थेची प्रगती होत आहे, असेही पचपोर यांनी यावेळी सांगितले.

संस्थेच्या आर्थिक प्रगती आलेखाची माहिती व संस्था करत असलेल्या सामजिक मदतीची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी दिली. संस्थेची कृष्णनगर शाखेची कर्ज वसुली 100% आहे, म्हणजेच संस्था कर्ज वितरणाबरोबर कर्ज वसुलीला जास्त महत्व देते, असे त्यांनी याप्रसंगी सांगितले. या कार्यक्रमात संस्थेकडून दोन अतिशय गरीब मुलींना त्यांच्या लग्नासाठी संपूर्ण भांड्यांचा सेट देण्यात आला. तसेच गरजू सभासदांना 76 लाख रुपयांचे कर्ज याप्रसंगी वितरित करण्यात आले. संस्थेचे शाखाध्यक्ष शंकरराव सायकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.